Join us  

'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट समोर! यंदाचा प्रवासही गणपतीपुळ्याचा पण कोकण रेल्वेने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 3:53 PM

सचिन पिळगावकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा २ सिनेमा या तारखेला होणार रिलीज (navra maaza navsaacha 2)

सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची सर्वांना आतुरता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटासंबंधी विविध व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अखेर नुकतीच 'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट जाहीर झालीय.  येत्या २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.

सिद्धीविनायकाचा आशीर्वाद घेऊन रिलीज डेट जाहीर

नुकतेच मुंबई येथील श्री. सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची २० सप्टेंबर ही रिलीज डेट जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ उपस्थित होते. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती,  कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत.

रिलीज  डेटचा टिझर लॉंच

'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत. त्यामुळे यंदा 'नवरा माझा नवसाचा २' ची मजा आणखी मनोरंंजक ठरणार यात शंका नाही.

टॅग्स :सचिन पिळगांवकरअशोक सराफस्वप्निल जोशीसुप्रिया पिळगांवकरसिद्धार्थ जाधव