Join us  

भर पावसात वडापाव खाताना दिसले सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 9:49 AM

सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी वडापावचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ सचिन पिळगावकर यांच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे.

अभिनयाला विनोदाची साथ देत ९०चं दशक गाजवणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर. 'अशी ही बनवाबनवी', 'आमच्यासारखे आम्हीच', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'माझा पची करोडपती', 'अदला बदली', 'आयत्या घरात घरोबा', 'गंमत जंमत', 'नवरा माझा नवसाचा' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र दिसली. आता पुन्हा एकदा अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर ही जोडी 'नवरा माझा नवसाचा २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नुकतीच 'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीड डेट जाहीर करण्यात आली आहे. यानिमित्ताने अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं. गणरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी वडापावचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ सचिन पिळगावकर यांच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत पावसात सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ वडापाव खाताना दिसत आहेत. 

"बाप्पाचं दर्शन, पाऊस आणि वडापाव...तो सुद्धा किर्ती कॉलेजच्या जवळचा अशोक वडापाव...बाजूला अशोक आणि हातात अशोक वडापाव...हा बडा भाव आणि हा वडापाव..." असं सचिन पिळगावकर या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, 'नवरा माझा नवसाचा'मध्ये अशोक सराफ यांनी लालू कंडक्टरची भूमिका साकारली होती. पण, 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये मात्र मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या सिनेमात ते लालू कंडक्टर नव्हे तर टीसी(Ticket Checker) च्या भूमिकेत दिसणार आहेत. २० सप्टेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सचिन पिळगांवकरअशोक सराफसिनेमा