Join us  

पूजा सावंतची मॅनेजर ते अ‍ॅनिमल रेस्कुअर, बहिणीच्या पावलावर पाऊल न ठेवता रुचिराने धरली वेगळी वाट

By कोमल खांबे | Published: October 09, 2024 1:34 PM

Navratri Special 2024 : पूजाची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या रुचिराने स्वत:ची एक वेगळी ओळखही जपली आहे. कॉलेजमध्ये कल्चरल कोऑरडिनेटर म्हणून काम बघणारी रुचिरा एक सर्टिफाइड अ‍ॅनिमल रेस्क्युअर आहे. लोकमत फिल्मीशी संवाद साधताना रुचिराने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितलं. 

लोकमत फिल्मीच्या 'नवदुर्गा' या उपक्रमात आजची नवदुर्गा आहे रुचिरा सावंत. रुचिरा ही लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतची बहीण आहे. पूजाने सिनेइंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केल्यापासून रुचिरा तिच्याबरोबर सावलीसारखी उभी राहिली. पूजाची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या रुचिराने स्वत:ची एक वेगळी ओळखही जपली आहे. कॉलेजमध्ये कल्चरल कोऑरडिनेटर म्हणून काम बघणारी रुचिरा एक सर्टिफाइड अ‍ॅनिमल रेस्क्युअर आहे. गेली १२ वर्ष ती हे काम करत आहे. लोकमत फिल्मीशी संवाद साधताना रुचिराने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितलं. 

>> कोमल खांबे

रुचिरा सध्या काय करते? 

माझ्या घरात सगळ्यांचं काम हे या इंडस्ट्रीशी संबंधित आहे. पूजा दीदी तर आहेच पण, रियाटरमेंटनंतर बाबांनी प्रोडक्शन कंपनी सुरू केली आहे. आता ते निर्माते आहेत आणि माझा भाऊही ते बघतो. माझंदेखील करिअर याच रिलेटेड आहे. मी कॉलेजच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचे. सध्या मी कल्चरल कोऑरडिनेटर म्हणून काम करते. माझे अनेक विद्यार्थी रिएलिटी शोमध्येही गेले आहेत. 

पूजा इंडस्ट्रीत आल्यापासून तू तिचं मॅनेटमेंट बघत आहेस. सेलिब्रिटींचे मॅनेजर नक्की काय काम करतात? 

दीदी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा कुठलाच गॉडफादर नव्हता. त्यामुळे तेव्हापासून आम्ही तिच्याबरोबर आहोत. जेव्हा दीदी या इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा सेलिब्रिटी मॅनेजर वगैरे या गोष्टी फारशा नव्हत्या. त्यामुळे मग तिच्याबरोबर इव्हेंटला आई किंवा मी जायचे. तेव्हा मॅनेजर वगैरे नसल्याने तिच्या बऱ्याच गोष्टी मीच हँडल करायचे. आम्ही दोघी मिळून स्क्रिप्ट वाचायचो. स्टायलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही नेहमी मिळून केल्या आहेत. आता ती एक नावाजलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे त्यादृष्टीने आणि मलाही माझ्या करिअरकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने आता तिच्याकडे मॅनेजर आहे. पण, अजूनही तिचे महत्त्वाचे प्रोजेक्ट मीच बघते. 

आता पूजा परदेशात गेल्यानंतर तिच्या कामाबाबतच्या गोष्टी कशा मॅनेज होतात? 

दीदीच्या लग्नानंतर चित्र बदललं आहे. ती फक्त शूटिंगसाठी इकडे येते. त्यामुळे काही गोष्टी मलाच बघाव्या लागतात. अजूनही दीदी मला स्क्रिप्ट वाचण्यासाठी सांगते. आम्ही दोघींनीही कधीच करिअरच्या बाबतीत एकमेकींची साथ सोडलेली नाही आणि शेवटपर्यंत सोडणारही नाही. दीदी कुठल्या इव्हेंटला जाणारे, रेड कार्पेटवर काय घालणारे, स्टायलिंग कसं करणारे, या तिच्या सगळ्या गोष्टींकडे माझं अजूनही लक्ष असतं.  

पूजाची बहीण आणि मॅनेजर या व्यतिरिक्तही तू तुझी एक वेगळी ओळख जपते आहेस. तू एक सर्टिफायइड अॅनिमल रेस्क्युयर आहेस. त्याबद्दल काय सांगशील? 

मी गेली १२ वर्ष हे काम करतेय. आमचं स्वत:चं एनजीओ असावं असं पूजा दीदी आणि माझं स्वप्न आहे. मी प्राण्यांची डॉक्टर नाहीये. पण, प्राण्यांना सलाइन कसं लावायचं, व्हॅक्सिनेशन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी मला येतात. आजपर्यंत मी अनेक प्राण्यांना रेस्क्यू केलेलं आहे. रस्त्यावरील जास्तीत जास्त कुत्रे आणि मांजरांना घर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण, फेस व्हॅल्यू असेल तर हे काम जास्तीस जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे मी सध्या सोशल मीडियावर याबाबत व्हिडिओ, पोस्ट शेअर करते. आमच्या कामामुळे लोकांनाही प्रेरणा मिळते. मी फोनवरुन लोकांना प्राण्यांवर कसे उपचार करायचे, त्यांना कोणती औषधं द्यायची, हेदेखील सांगते. खारुताईचं आयुष्य हे ४ वर्ष असतं. पण, माझ्याकडे एक खारुताई गेली ७ वर्ष होती. तिचं नाव रिओ होतं. ती गेल्यानंतर तिच्या नावाने मी 'रिओ फाइंड युवर वे' हा बिजनेस सुरू केला आहे. यामध्ये प्राण्यांच्या डिझाइन्स असलेल्या ज्वेलरी मिळतात. माझ्या आर्ट डिपार्टमेंटमधल्या मुलीच हे डिझाइन करतात. यामध्ये प्रत्येक ऑर्डरनंतर एक कुत्रा किंवा मांजरीला आम्ही खाऊ घालतो. आतादेखील माझ्याकडे एक खारुताई आहे. आधी मला याबाबत माहिती नव्हती. पण, आता मला खारुताई स्पेशालिस्ट म्हणतात. 

सावंत सिस्टर्सचं प्राणीप्रेम कधी लपून राहिलेलं नाही. पण, या सगळ्याची नेमकी सुरुवात कशी झाली? 

आमच्या घरातच प्राणीप्रेम खूप आहे. माझे आजोबा आणि वडिलांनीही प्राण्यांची खूप सेवा केली. अनेक प्राण्यांना त्यांनी रेस्क्यू केलेलं आहे. मला वाटतं आमच्यात हे त्यांच्यामधूनच आलं आहे. दीदीलाही प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. पण, ती खूप भावनिक असल्याने हे शक्य झालं नाही. पण, मी अगदी याउलट आहे. आता आम्ही दोघीही आमची कामं सांभाळून या गोष्टी करतो. जेव्हा चक्रीवादळ आलं होतं तेव्हा आमच्या घरात १७ पक्षी होते. अशावेळेस दीदीला आणि मला कामातून थोडा वेळ ब्रेक घेऊन प्राण्यांकडे लक्ष द्यावं लागतं. एका पर्ल नावाच्या एनजीओमध्ये मी सध्या काम करत आहे. आता मला सरकारकडून कुठल्याही प्राण्यांना किंवा पक्ष्यांना हाताळायचं लायसन्स मिळणार आहे.   

गेल्या काही दिवसात प्राण्यांवर अत्याचार झाल्याचे त्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. याबाबत कुठेतरी जागरुकता निर्माण करण्याची आणि प्राण्यांबाबत कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे असं वाटतं? 

सध्या एनजीओमार्फत प्राण्यांबद्दलचे कायदे अधिक कठोर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्राण्यांवर अत्याचार झाल्याचा एफआयआर केला की त्यांना शिक्षा होते. पण, ५० रुपयांचा दंड आकारून सोडून दिलं जातं. तो एक कायदा आणखी कठोर व्हायला हवा. सोसायटीमधील प्राण्यांना पण बऱ्याचदा हकलवून लावण्यात येतं. अशा सोसायटींना आम्ही नोटीस देतो. जर असं केलं तर त्यांच्यावर केस होऊ शकते. 

पूजाबरोबर काम करताना इंडस्ट्रीत काही वाईट अनुभव आलेत का?

'क्षणभर विश्रांती' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा हा किस्सा आहे. दीदी नेहमी तिच्या बॅगेत प्राण्यांचं अन्न ठेवते. ज्या बंगल्यात सिनेमाचं शूटिंग व्हायचं त्याबाहेर एक कुत्रा होता. दीदी रोज त्याला खायला द्यायची आणि शूटिंगला जायची. पण, एकेदिवशी सकाळी त्या कुत्र्याला पहाटे गाडीने उडवलं. सेटवर हे सगळ्यांना माहीत झालं होतं. पण, दीदीचा महत्त्वाचा सीन असल्याने आणि ती खूप भावनिक असल्याने तिला याबाबत काही सांगायचं नाही, असं ठरलं होतं. पण, इंडस्ट्रीमध्ये नव्या चेहऱ्यांना काही लोक मुद्दाम त्रास देतात. अशाच एका व्यक्तीने दीदीला हे जाऊन सांगितलं. आणि दीदी रडायला लागली. त्यानंतर तिने मला फोन केला. मी दीदीला समजावलं आणि मग तिने तो सीन दिला. आणि तो सीनही हिट झाला. 

पूजाबरोबर तिचं मॅनेजमेंट पाहताना सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एखादा किस्सा आहे का? 

पूजा दीदीच्या बॉलिवूडच्या पहिल्या सिनेमात तिला हत्तींबरोबर शूट करायचं होतं. तेव्हा बँकॉकमध्ये एक महिना शूट होतं. पहिले दोन आठवडे दीदीला हत्तीबरोबर राहायचं होतं. पण, दीदी घाबरत होती. आणि प्राणी एनर्जीला लगेच रिअॅक्ट करतात. मी प्राण्यांनाही ट्रेन करते. त्यामुळे मग मी आधी हत्तीला ट्रेन केलं. मग दीदी त्याच्या जवळ गेली. आणि मग त्यांच्यात बॉण्डिंग झालं.

ताईला स्क्रीनवर बघून आपणंही मोठ्या पडद्यावर झळकावं असं कधी वाटलं नाही का? आणि भविष्यात कधी ऑफर आलीच तर काम करायला आवडेल का? 

मला मालिकेची एक ऑफर मिळाली होती. पण, तेव्हा माझे थोडे हेल्थ इश्यू होते. मी दीदीच्या एका सिनेमात काम केलेलं आहे. सतरंगी नावाच्या सिनेमाच्या शूटिंगवेळी मी पाऊस पडत असल्याने एक मुलगी आली नव्हती. तेव्हा सिनेमात तिची अगदी छोटी भूमिका होती. ती मी केली होती. त्यानंतर कधी असा चान्स मिळाला नाही. पण, खरं सांगायचं तर अभिनेत्री व्हावं हे माझं ध्येय कधीच नव्हतं. मला नेहमी प्राण्यांसाठी काहीतरी करायचं होतं.

इंडस्ट्रीतील अनेकांशी तुझी मैत्री आहे. या इंडस्ट्रीकडे पूजाची बहीण म्हणून नाही तर रुचिरा म्हणून तू कसं पाहतेस?

मराठी इंडस्ट्रीचा अभिमान वाटतो. कारण, इथले लोक एकमेकांना खूप सपोर्ट करतात. नवीन आणि चांगले टॅलेंट इंडस्ट्रीमध्ये येत्यात. खूप चांगले मराठी चित्रपट येत आहेत. पण, साऊथ इंडस्ट्रीत जसा एकजूटपणा आहे तो थोडासा कमी आहे असं जाणवतं.

तुझ्या आयुष्यातील दुर्गा कोण आहे? 

माझ्यासाठी माझी बहीण पूजा हीच दुर्गा आहे. माझी बहीण माझ्या आईवडिलांना बघून सगळ्या गोष्टी शिकली. आणि मी ताईकडे बघत मोठी झाले. जर ताईनेच ते आत्मसात केलं नसतं तर मी आज उत्कृष्ट डान्सर, अॅनिमल लव्हर नसते. एबीसीडीपासून सगळ्या गोष्टी मला ताईने शिकवल्या आहेत. त्यामुळे माझ्यासाठी तीच दुर्गा आहे.  

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४पूजा सावंतसेलिब्रिटी