Join us

आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

By मयुरी वाशिंबे | Published: October 10, 2024 3:43 PM

मुलगी, बायको अन् आता आई बनत धडाडीने पार पाडतेय जबाबदाऱ्या! महिला अत्याचारावर म्हणाली "एकट्या मुलीकडे संधी नाही तर जबाबदारी म्हणून बघा"!

लोकमत फिल्मीच्या 'नवदुर्गा' (Navratri Special 2024) या उपक्रमात आजची नवदुर्गा आहे कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad). मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून तिला ओळखलं जातं. मराठी मनोरंजनसृष्टीतील असंख्य गाण्यांना कार्तिकीने आवाज दिला आहे. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. तिच्या आवाजाचा मोठा चाहतावर्ग आहे. नवरात्रीनिमित्त कार्तिकीने आपला प्रवास मुलाखतीतून दिलखुलासपणे उलगडलाय.

मयुरी वाशिंबे...

  • सध्या नवरात्र सुरू आहे.  सगळीकडे एक छान वातावरणं असतं. यंदाची नवरात्र तुझ्यासाठी कशी आहे आणि तुझ्या घरी कसं वातावरण असतं?

यंदाची नवरात्र ही बाळ घरी आल्याने खूप खास आहे. यंदा बाळामुळे गायनाचे काही कार्यक्रम मी घेतले नाहीत. नवरात्रीत घरीच आहे. सासरी आणि माहेरी दोन्हीकडे घटस्थापना झाली आहे. रोज सकाळी देवीसाठी माळ बनवणे, पूजा करणे...  यंदाची नवरात्री अगदी उत्साहात सुरू आहे.  आम्ही दरवर्षी नवरात्रीमध्ये पहिल्या माळेला किंवा पाचव्या माळेला कुलदेवीचं दर्शन घेतो. यंदाही आम्ही बाळासह देवीचं दर्शन घेतलं.  

  • नवरात्रीत महिलांना विशेष म्हत्व दिलं जातं.  या सणाकडे महिला सशक्तीकरण म्हणूनही पाहिलं जातं. पण, खरचं आपल्याकडे महिलांचा सन्मान केला जातो ?  महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, या सर्व परिस्थितीवर तुझं नेमकं मत काय ?

 महिला प्रत्येक क्षेत्रात खूप पुढे जात आहेत. स्वतंत्र झाल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. पण, अशा घटना ऐकल्यानंतर प्रश्न पडतो की खरचं महिला सुरक्षित आहेत का? मी असे नाही म्हणणार की सगळीकडेच अशा घटना घडतात. पण काही मनोवृत्तीअसतात. नवरात्रीमध्ये आपण देवीला पुजतो. मग स्त्रीदेखील एक देवीचंच रुप आहे.  फक्त नऊ दिवस नाही तर कायम स्त्रीचा सन्मान केला गेला पाहिजे. तिच्याकडे वाकड्या नजरेने न बघता, त्या देवीचा सन्मान करणं महत्वाचं आहे. जर आता आपण पाहिलं तर मुली वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. मला त्यांच्या आई-वडिलांचंही कौतुक वाटतं की ते आपल्या लेकीला पुढे जाण्यासाठी पाठिंबा देत आहे. पण, अशा गोष्टी कानावर पडल्या की मग पालकही घाबरतात. आपल्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवावं की नाही, असा विचार काळजीपोटी त्यांच्या डोक्यात येतो. म्हणून प्रत्येकाने आत्मपरिक्षण करणं गरजेचे आहे. आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. आपल्या घरातूनच मुलांना संस्कार देणं गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मुलीला घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातेय, कधी येशील असे प्रश्न विचारतो. त्याप्रमाणे मुलांनाही प्रश्न विचारणं गरेजेचं आहे. एकटी मुलगी दिसल्यास तिच्याकडे संधी नाही, तर एक जबाबदारी म्हणून पाहिलं तर नक्कीच परिस्थिती बदलेल. 

  • आपल्याकडे खूप छान परंपरा आहेत, देवस्थान आहेत...  तशी तुझी कोणत्या देवावर अपार श्रद्धा आहे ?

सगळ्यांच देवावर श्रद्धा आहे. पण, माऊलींची मी खूप जास्त भक्त आहे. आळंदीची असल्याने आपसुकच एक कनेक्शन आहे.  जे काही आहे, ते त्यांचीच कृपा आहे. महादेवाचीही मी भक्त आहे. 

  • करिअरच्या शिखरावर असताना लग्नाचा निर्णय, त्यानंतर बाळं. आता बाळाला सांभाळायचं त्यात करिअरवर लक्ष द्यायचं यात तारेवरची कसरत कशी होतेय ? घरच्यांचा किती सपोर्ट आहे ?

माझं योग्य वयात लग्न झालं,  याचं सर्व श्रेय हे माझ्या बाबांना जातं. त्यांना वाटलं की योग्य वयात योग्य गोष्टी घडल्या पाहिजेत.  माझ्या डोक्यात लग्नाचा विचार नव्हता. काम सुरू होतं, कुटुबांसोबत आनंदी होते. संगीतामधून एम. ए झालं. त्यानंतर लग्न करायचंच आहे, म्हणून नाही. पण, सर्व गोष्टी छान जमून आल्या आणि सगळं काही व्यवस्थित झालं. लग्न आणि बाळ या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. यात कुटुंबाचा पाठिंबा असल्यास आणखी चांगलं काम करता येतं.  बाळ झाल्यानंतर सासर आणि माहेर अशा दोन्ही कुटुंबाचा मला खूप सपोर्ट आहे.  मी खूप भाग्यवान आहे की, मला अगदी वडिलांप्रमाणे कायम पाठिंबा देणारे सासरे लाभले आहेत. बाळ झाल्यानंतरही मी काही कार्यक्रम केले आहेत. यावेळी माझ्या सासूंनी माझी आणि बाळाची काळजी घेतली. त्या कायम मला साथ देतात. कुटुंबासोबत माझं बाळही खूप सपोर्ट करतं. त्यालाही कळतं की आईला काम आहे.  मी आई झाले, तेव्हा मला माझ्या आईचं महत्त्व आणखी कळालं. गरोदर असतानाही मी आठवा महिना लागेपर्यंत कार्यक्रम केलेत. मग या काळात गाडी हळू चालवणे असो किंवा इतर गोष्टींची माझा नवरा रोनीत आणि भाऊ कौस्तुभ यांनी खूप काळजी घेतली. 

 

  • लिटल चॅम्प ते 'सा रे ग म प' ची जज असा तुझा प्रवास राहिला आहे. मागे वळून आजपर्यंतचा प्रवास पाहिल्यानंतर काय वाटतं?

खूप छान वाटतं. एका मुलीच्या आयुष्यात काही टप्पे असतात. त्यातून मी जातेय. त्यात असलेला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा, विशेष करुन माझे बाबा. तेच माझे गुरू आहेत. मी पुर्णपणे त्यांच्यावरती अवलंबून आहे. मला वाटतं आपले आई-वडील आपल्यासाठी जो विचार करतात. ते इतर कुणीही करू शकत नाही. आपल्यालाही आपल्यातील गूण माहिती नसतात. पण, ते या गोष्टी जाणून असतात. माझ्या करिअरमध्ये बाबांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आहे. 'सा रे ग म प'च्या पर्वात बाबांनी स्व:ताचे गायनाचे कार्यक्रम थांबवून मला पुर्ण वेळ दिला. माझ्या यशाचं सर्व श्रेय हे माझ्या आई-बाबांना जातं. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे  पाय जमिनीवर ठेवून माझा हा प्रवास सुरू आहे. मला अजून त्यांचं नाव मोठ करायचं आहे. मी गायनात आणखी पुढे जावं, अशी त्यांची इच्छा मी पुर्ण करणारा आहे. सोबतच संसारही सुरू आहे.  एक मुलगी, बायको, आई म्हणून वाटल्याला आलेल्या जबाबदाऱ्या पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करतेय. 

  •  तुझ्या आयुष्यातील दुर्गा कोण आहे? 

माझी आई ही माझ्या आयुष्यातील दुर्गा आहे. मी, माझा भाऊ कौस्तूभ, बाबा आम्ही आमच्या गाण्याच्या कार्यक्रमामुळे बाहेर असतो. पण, तिने खूप छान घर सांभाळलं आहे. तिच्यावर अवलंबून राहून आम्ही बाहेर जाऊन कार्यक्रम करू शकतो. कुटुंब हेच तिचं आयुष्य आहे आणि हे ती फार समाधानाने जगतेय. माझ्या आईकडून मला खूप काही शिकायला मिळतं. 'सा रे ग म प'नंतर खूप लोकं घरी भेटायला घरी यायची, आईने तेव्हा सर्वांचा पाहुणचार केला. हेच नाहीतर माझ्या बाबांकडे अनेक विद्यार्थी होते. फक्त आपल्या स्व:ताच्या मुलांचा नाही तर गुरुकुलमधील मुलांनाही तिने सांभाळलं. त्यांचं रोजचं जेवणाचं आईचं पाहायचं. ते आज ते सर्व मोठे झालेत, काहींची लग्न झाली आहेत. ते आजही भेटायला घरी येतात.

 

  •  तु वारकरी परंपरेतून येतेस, आयुष्यात योग्य मार्गाने चालण्यासाठी अध्यात्मिक शिकवण किती महत्त्वाची आहे, असं तुला वाटतं.

आयुष्यात आध्यात्मिक बैठक फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मनस्थिती चांगली राहते. देवापुढ्यात आपण पाच मिनिटं जरी बसलो, तरी मन शांत होतं. आपण तर एवढे भाग्यवान आहोत की, आपल्या महाराष्ट्राला संताची मोठी परंपरा आहे. आपल्या संतानी केवढे मौल्यावान विचार आपल्याला दिलेत. हे सगळं आपण ऐकणं किंवा वाचणं महत्त्वाचं आहे. महिलांवर जे अत्याचार होतात, जर आध्यात्मिक बैठक असेल तर अशा घटना घडणार नाहीत. दरवर्षी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. गेल्या कित्येक वर्षांपासून वारी सुरू आहे.  वारीमध्ये अनेक महिला, पुरुष असतात. पण, कधीही गालबोट लागलेलं नाही.  आता टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी तरुण मुलेही कुतूहल म्हणून वारीत सहभागी होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मीदेखील अनेकदा वारीचा आनंद अनुभवलेला आहे. 

 

  • आयुष्यात अशी कधी वेळ आली का, की तु दुर्गा बनलीस ?

आयुष्यात आपल्याला काही मोठे निर्णय घेण्यासाठी दुर्गा बनावं लागतं. माझ्या आई-बाबांनी मला तेवढं कणखर बनवलं आहे.  एक असा प्रसंग माझ्या आयुष्यात घडला होता की, लॉकडाऊन संपल्यानंतर कार्यक्रमासाठी मी एकटी कतारला गेले होते.  तेव्हा झालं असं की कौस्तुभ आणि माझा एक कार्यक्रम कतारमध्ये आयोजित होता. आम्ही दोघे कतारला जाण्यासाठी विमानतळावर पोहचलो. पण त्याच्या पासपोर्टमध्ये काहीतरी अडचण निर्माण झाली. तेव्हा मला एकटीला कतारला जावं लागलं. मी महाराष्ट्रातही कधी एकटी फिरले नव्हते आणि वेळ अशी आली की मला थेट दुसऱ्या देशात एकटीला जावं लागलं. तो एक अविस्मरणीय प्रवास होता. त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला.

 

  • इतकं यश मिळवूनही जमिनीवर पाय ठेवून आहेस, हे कसं जमतं ?

माझ्या घरी सांप्रदायिक वातावरण आहे. आई-वडिलांचे संस्कार आहेत. त्यावरच पाऊल टाकत पुढे जातेय.  मी २००९ साली 'सा रे ग म प'ची विजेती झाले. त्यानंतर माझा भाऊ कौस्तूभ 'गौरव महाराष्ट्राचा' विजेता झाला, माझा तिसरा भाऊ कैवल्य तोही गातो. आम्ही सर्व जण ग्लॅमरच्या दुनियेत वावरतो. पण, मातीशी नाळ जोडून आहे.  आता येत्या काळातही माझे काही खास प्रोजेक्ट येणार आहेत. 

  •  तुझी सौंदर्य याबद्दलची व्याख्या काय आहे? 

मला वाटतं तुमच्यात जी कला आहे, तेच तुमचं सौंदर्य आहे. गायिका ही दिसायला छानच पाहिजे असं काही नाही. त्याबरोबरच इतरांशी तुम्ही कसे वागता हेदेखील महत्त्वाचे आहे. 

  • तुला ट्रोलिंगचा अनुभव आला आहे का?

मला ट्रोलिंगचा जास्त अनुभव नाही.  मी लहान होते, तेव्हापासून प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं आहे.  मी त्यांना त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती वाटते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्यातील आनंद त्यांच्यासोबत शेअर करते. फक्त जेव्हा आम्ही 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्सचं परीक्षण केलं. तेव्हा थोडा अनुभव आला होता.  

 

टॅग्स :सेलिब्रिटीमराठी गाणीनवरात्रीशारदीय नवरात्रोत्सव २०२४टिव्ही कलाकार