राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले होते. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दोन्ही गटांनी दावा सांगितल्याने हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता. मंगळवारी(६ फेब्रुवारी) याबाबत निवडणूक आयोगाने सुनावनीनंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. आता याबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे. अनेक जण सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनीही याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही... हा जमाना आकड्यांचा आहे," असं अरविंद जगताप यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शरद पवार गटाला बुधवारी दुपारपर्यंत तीन नावांचे पर्याय देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाच्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असं ते म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शरद पवार गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.