‘कॉफी आणि बरंच काही’, ‘निळकंठ मास्तर’, ‘आजोबा’, ‘सिध्दांत’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली गुणी अभिनेत्री नेहा महाजन आता 'युथ' या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात नेहा युतिका ही भूमिका साकारत आहे. ‘युतिका’ ही कॉलेज तरूणी आहे असं नेहा सांगते. ऐकून आणि वाचून मिळालेले शहाणपण या दोन्हींमध्ये फरक असतो. अनुभवातले शहाणपण थोडे जास्त परिपक्व असते. तर असे अनुभवातले शहाणपण युतिकाकडे आहे. तसेच युतिकाच्या गुणांचे वर्णन करताना ती खूप उत्कट असून तिच्यात नेतृत्त्व गुण असल्याचे नेहा म्हणाली.
युथ म्हटल्यावर मजा, मस्ती आणि धमाल असा एकंदर विचार आपल्या डोक्यात येतो. याच युथ च्या समोर एक गंभीर प्रश्न उभा राहतो आणि या प्रश्नातून कसे त्यांचे आयुष्य बदलते. यावर आधारीत युथ हा सिनेमा आहे. विक्टरी फिल्मस् प्रस्तुत आणि सुंदर सेतुरामन निर्मित 'युथ' हा चित्रपट येत्या ३ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान या चित्रपटाचा सामाजिक विषय आणि नेहाच्या वाट्याला आलेली युतिका ची व्यक्तिरेखा या दोन कारणांसाठी तिने हा चित्रपट स्वीकारल्याचे ती म्हणते. तर अशी ही युथ ला स्पेशल टच देणारी युतिका येत्या 3 जूनला पाहायला मिळणार आहे.