Join us  

कॉलेजचं राजकारण ते प्रेमप्रकरण! 'नेता गीता' नवा मराठी सिनेमा; शिवानी बावकरसोबत या अभिनेत्याचं सिनेसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 4:49 PM

नेता गीता नावाच्या नव्या मराठी सिनेमाची घोषणा झालीय. शिवानी बावकर सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे (neta geeta)

मराठी मनोरंजन विश्वात आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा झालीय. लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाचं नाव 'नेता गीता'. कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते. कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास नेता गीता या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, अभिनेत्री शिवानी बावकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेता सुधांशू महेश बुडुख या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.     

'नेता गीता' सिनेमाचा हटके विषय

कॉलेज जीवनात तरुणाईचा सळसळता उत्साह असतो. या उत्साहातच कॉलेजच्या निवडणुका लढवल्या जातात. अशाच एका निवडणुकीच्या निमित्ताने घडणारी मनोरंजक गोष्ट "नेता गीता" या चित्रपटातून उलगडणार आहे. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहे. या चित्रपटातही याचा काहीसा अनुभव आपल्याला मिळणार असून कॉलेजमधील प्रेमप्रकरण, मैत्रीचे समीकरण, राजकरण यासर्वांसोबतच गीतेचे प्रवचन आपल्याला अनुभवता  येणार आहे.  चित्रपटाच्या पोस्टरवरून कथानकातला ताजेपणा व्यक्त होत आहे. 

 

'नेता गीता' सिनेमातले कलाकार आणि रिलीज डेट

सिम्बारिया फिल्म्सतर्फे "नेता गीता" या चित्रपटाची निर्मिती आणि  प्रस्तुती करण्यात येत आहे.  सुधांशू महेश बुडुख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. शिवानी बावकरसह सुधांशू बुडुख रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर, विराज अवचिते, सुहास जोशी, सुचेत गवई, विक्रांत धीवरे  असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीर हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. २३ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 

टॅग्स :शिवानी बावकरमराठी चित्रपटमराठी अभिनेता