Join us

निखिल चव्हाण बनला खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 4:23 AM

अल्पावधीतच घराघरांतल्या रसिकांच्या मनात शिरून लोकप्रियता मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये आता निखिल चव्हाणचा समावेश नक्की करावा लागेल. छोट्या पडद्यावरील ‘लागीरं झालं जी’ ...

अल्पावधीतच घराघरांतल्या रसिकांच्या मनात शिरून लोकप्रियता मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये आता निखिल चव्हाणचा समावेश नक्की करावा लागेल. छोट्या पडद्यावरील ‘लागीरं झालं जी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता निखिल चव्हाण आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाला आहे. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी चित्रपटात निखिल झळकणार आहे.  आर. पी. प्रॉडक्शनची प्रस्तुती असणारा हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निखिलबाबत सांगायचं तर झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘लागीरं झालं जी’ या या मालिकेत नायकाच्या मित्राची म्हणजेच विक्रमची भूमिका निखिलने साकारली आहे. ‘अॅट्रॉसिटी’मध्ये निखिलने मनीष चौधरी नावाची व्यक्तिरेखा साकारली असून, हा चित्रपटाचा खलनायक आहे. ‘अॅट्रॉसिटी’सारख्या महत्त्वाच्या विषयावर आधारित असलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याने निर्माता आणि दिग्दर्शकाचे आभार मानत निखिल म्हणाला की, सर्वच कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची इच्छा असते, पण पदार्पणातच खलनायकासारखी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्याचं नवं रूप सादर करता आल्याचा खूप आनंद आहे.‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र पडोळे यांची असून दिग्दर्शन दिपक कदम यांचे आहे. निखिलसोबत या चित्रपटात ऋषभ पडोळे व पूजा जैस्वाल ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संकल्पना डॉ. राजेंद्र पडोळे यांची असून राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. छायांकन राजेश सोमनाथ तर संकलन विनोद चौरसिया यांचे आहे. संगीत अमर रामलक्ष्मण यांचे आहे. ‘अॅट्रॉसिटी’ हा सिनेमा २३ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.