सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे ही बाब आज प्रत्येकालाच माहिती आहे. आकर्षक आमिषांच्या बोगस ईमेल आणि मेसेजच्या माध्यमातून लाखो लोकांची फसवणूक झालेली असतानाही अनेक जण त्या जाळ्यात सापडतात. आपल्या चतुरस्त्र अभिनयाने विविध भूमिका सहजपणे पेलणारे अभिनेता निखील रत्नपारखी ही बोगस ईमेलच्या जाळ्यात अडकला आहे. हा ईमेल नेमका कसला आहे याचा खुलासा अजून झाला नसला तरी लवकरच या ईमेलमागचे सत्य बाहेर येईल.
‘बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत २० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘ईमेल फिमेल’ या सिनेमात निखील रत्नपारखीला नेमका कसला ईमेल आला आहे याचा खुलासा होणार आहे. या सिनेमाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधवने केले आहे. ‘ईमेल फिमेल’ या सिनेमात शंतनू ही मध्यमवर्गीय व्यक्तिरेखा साकारत निखील एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे . एका ईमेलमुळे झालेला त्रास व त्या ईमेलमागचे गुपित घरच्यांना कळू नये यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत व त्यातून होणारा मनोरंजक घटनाक्रम म्हणजेच ‘ईमेल फिमेल’ हा सिनेमा.
आपल्या भूमिकेबद्दल निखीलने सांगितले की, आजची पिढी एकमेकांशी ‘कनेक्ट’ राहण्यासाठी इमेल, फेसबुक, व्हॉटसअप् सारख्या समाजमाध्यमांचा वापर करते. अनेक गोष्टींची माहिती या माध्यमांद्वारे पुरवली जाते. अशाच माहितीतून काय घडू शकते हे दाखवताना सोशल साइट्सचा योग्य वापर केला, तर फायदा आहे अन्यथा आपण अडचणीत यायला वेळ लागणार नाही हे लक्षात आणून देणारा हा सिनेमा आहे.
निखिल रत्नपारखी यांच्यासोबत या सिनेमात विक्रम गोखले, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी आणि बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. सिनेमाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवणकुमार राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे.