मुंबईत राहणाऱ्या तीरा कामत हिच्या इंजेक्शनचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि यासाठी एका मराठी अभिनेत्याने विशेष मेहनत घेतली आहे. तीरा कामत या चिमुकलीला SMA Type 1 हा दुर्धर आजार असल्याचे निदान काही महिन्यांपूर्वी झाले होते. तीराला लागणारं इंजेक्शन भारतात तयार केलं जात नाही. त्यासाठी ते अमेरिकेतून भारतात आणणं आवश्यक होतं. या इंजेक्शनचीच किंमत तब्बल १६ कोटी रूपये इतकी होती. तीराच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून ही रक्कम जमवली होती. परंतु त्यानंतर त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे आयात करण्यात येणाऱ्या इंजेक्शनवर लागणाऱ्या कस्टम ड्युटी आणि जीएसटीच्या रकमेचा. परंतु आता त्यावरील लागणाऱ्या या शुल्कात सूट देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागानंदेखील सर्टिफिकेट दिलं आहे.
तीराच्या इंजेक्शनवरील कर माफ व्हावा यासाठी एका अभिनेत्याने मेहनत घेतली आहे. अभिनेता निलेश दिवेकरने राज्य सरकारकडे यासाठी सतत पाठपुरावा केला. निलेशने याविषयी सांगितले की, तीराबद्दल मला कळल्यानंतर मी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडे तोपर्यंत पुरेसे पैसे जमा झाले होते. लोकांनी मोठ्या संख्येने पुढे येत तिला मदतीचा हात दिला होता. पण त्यांच्यासमोर इंजेक्शनवर लागणाऱ्या कस्टम ड्युटी आणि जीएसटीच्या रकमेचा प्रश्न होता. यामुळे इंजेक्शची किंमत अधिक वाढणार होती. त्यामुळे ही गोष्ट मी शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या कानावर घातली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल सांगितले आणि त्यांनी आरोग्य विभागाला या प्रकरणात लक्ष देण्याचे आदेश दिले. आरोग्य विभागाने देखील जलदगतीने काम करत तिच्या इंजेक्शनवरील कर माफ केला.
SMA Type 1 हा आजार तसा दुर्मिळ आहे. भारतात सध्या या आजारावर कोणतंही औषध नाही. परंतु अमेरिकेत या आजारावरचं औषध उपलब्ध आहे. सध्या तीराची प्रकृती पाहता तिला अमेरिकेत नेऊन उपचार करणं शक्य नसल्यानं तिचे पालक मिहिर कामत आणि प्रियांका कामत यांनी ते इंजेक्शन भारतात आणण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या इंजेक्शनसाठी लागणारा खर्च हा फार मोठा होता. या इंजेक्शनसाठी तब्बल १६ कोटी रूपये मोजावे लागणार होते. मिहिर हे एका आयटी कंपनीत काम करतात. तर प्रियांका या फ्रिलांस इलेस्ट्रेटर म्हणून काम करतात. १६ कोटी रूपयांएवढी मोठी रक्कम कशी जमवायची असा प्रश्न दोघांच्या समोर होता. त्याचवेळी त्यांना कॅनडामध्ये मोठ्या आजारांसाठी क्राऊड फंडिंगचा आधार घेतला जात असल्याचं वृत्त दिसलं. त्यामुळे त्यांनीही असेच पैसे उभारण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर तीराला असलेल्या आजाराविषयी माहिती शेअर केली. तसंच त्यांनी 'फाईट्स एसएमए' असं इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पेजही तयार केलं. यानंतर त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आणि त्यांनी या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून १६ कोटी रूपये जमवले.