अभिनयाचा वाहता झरा म्हणजे निळू फुले (Nilu Phule). भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेले. अगदी बॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका गाजवला. निळू फुलेंची लेक गार्गी फुले (Gargi Phule) देखील अभिनेत्री आहे. 'तुला पाहते रे' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. तर आता गार्गीचा नवरा म्हणजेच निळू फुलेंचा जावई सुद्धा मराठी सिनेमात झळकणार आहे. आगामी 'आईच्या गावात मराठीत बोल' या सिनेमात ओंकार थत्ते (Omkar Thatte) यांची भूमिका आहे.
'3 इडियट्स' फेम अभिनेता ओमी वैद्य (Omi Vaidya) ज्याला सर्वच चतुर नावाने ओळखतात तो मराठी सिनेमात पदार्पण करत आहे. त्याचा 'आईच्या गावात मराठीत बोल' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याच सिनेमात निळू फुलेंचे जावई ओंकार थत्ते यांनीही काम केले आहे. सिनेमात मराठी शिकण्यासाठी ओमी वैद्य ओंकार थत्तेंची मदत घेताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची भूमिकाही कॉमेडी असणार आहे. या सिनेमातून ते अभिनयात पदार्पण करत आहेत. तर ओमी वैद्यही पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकत आहे. याशिवाय सिनेमात पार्थ भालेराव, संस्कृती बालगुडे, नेहा कुलकर्णी, विद्याधर जोशी, इला भाटे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख यांचीही मुख्य भूमिका आहे.
गार्गी फुले आणि ओंकार थत्ते यांना एक मुलगाही आहे. सध्या दोघंही निळू फुलेंच्या बायोपिकवर काम करत आहेत. त्यांचा बायोपिक लवकरात लवकर पडद्यावर यावा अशी त्यांची इच्छा आहे. तसंच फक्त 'बाई वाड्यावर या' एवढीच त्यांची इमेज नाही तर त्यापेक्षा ते खूप वेगळे आहेत. ती इमेज तोडावी म्हणून ही बायोपिक आणणार आहे अशी प्रतिक्रिया गार्गी फुलेने दिली होती.