Join us

निपुण धर्माधिकारीचा ‘धप्पा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 7:59 PM

‘धप्पा’ हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ठळक मुद्दे‘धप्पा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘‘तुला माहीत आहे ना बाहेरचं जग कसं आहे?’’ या प्रश्नावर ‘’बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळं नको बनवू.’’ असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आज होत नाही. उलट आपल्या मुलांनी चार भिंतीत राहावे असे पालकांना वाटते. मात्र निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ या मराठी चित्रपटातील हा संवाद काही तरी वेगळे सांगू पाहत आहे, हे चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर मध्ये बघायला मिळते. या ट्रेलरमुळे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या, बहुप्रतिक्षित ‘धप्पा’ बद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.

विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'नर्गिस दत्त' पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. ‘धप्पा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली’ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयीचा संदेश देणार आहेत. या नाटकाच्या लेखिकेने वेग वेगळ्या पात्रांच्या मदतीने हा संदेश दिला आहे. ज्यामध्ये येशू ख्रिस्त या पात्राचा पण समावेश आहे. मात्र काही लोकांना ती बाब खटकते आणि परिणामी या लहान मुलांच्या नाटकाला विरोध होतो. त्यांचे पालक सुद्धा त्यांच्या बाजूने उभे राहत नाहीत. ज्या वयाच्या मुलांना 'राजकारण म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो ती मुले या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी ‘मिशन झॅप झॅप’ आखतात त्याचा रंजक प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे.

या चित्रपटात अनेक लहान मुलांसह इरावती हर्षे, सुनिल बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘धप्पा’ या चित्रपटाचे निर्माते सुमितलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत.  हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सुनील बर्वे