स्त्री अत्याचाराविरोधात आवाज उठवणारी ‘निर्भया’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 18:56 IST
रोज वर्तमानपत्र उघडलं की, महिला अत्याचाराच्या बातम्या नजरेला पडतात त्या बातम्यांची तीव्रता एवढी भीषण आहे की, आता त्या वाचून ...
स्त्री अत्याचाराविरोधात आवाज उठवणारी ‘निर्भया’
रोज वर्तमानपत्र उघडलं की, महिला अत्याचाराच्या बातम्या नजरेला पडतात त्या बातम्यांची तीव्रता एवढी भीषण आहे की, आता त्या वाचून वाटणारी अस्वस्थता कमी होत चालली आहे की काय अशी शंका येऊ लागलेली आहे. कुठल्या दिशेला चाललोय आपण? आणि या सगळ्या परीस्थितीवर उत्तर काय ? या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न ‘निर्भया’ सिनेमातून निर्माते व दिग्दर्शकांनी केला आहे. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता या घटनांकडे समाज आणि व्यवस्थेने गंभीरपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. स्त्री अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणारा ‘निर्भया’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपल्या सभोवताली घडणाऱ्या या संवेदनशील प्रश्नावर निर्माते अमोल अहिरराव व दिग्दर्शक आनंद बच्छाव (साई आनंद) व्यक्त झाले आहेत. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या निर्भयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.वाढत्या स्त्री अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्माता व दिग्दर्शकांनी एक चांगला चित्रपट दिल्याची भावना प्रेक्षकांकडून व्यक्त केल्या जातेय. महिलांवरील अत्याचार आणि समाजाच्या मानसिकतेचे चित्रण दाखवताना निर्भयाने तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध उभारलेला लढा आज प्रत्येकीने लढायाची आवश्यकता असल्याचा संदेश या चित्रपटातून दिला आहे. हा चित्रपट प्रत्येकाला लढण्यासाठीचं बळ देईल असा विश्वास निर्माते अमोल अहिरराव व्यक्त करतात. स्वानंदी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत योगिता दांडेकर असून तिच्यासह स्मिता जयकर, किशोर महाबोले, अनिकेत केळकर, अभिजीत कुलकर्णी, ओंकार कर्वे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. छायांकन मनिष पटेल यांनी केलं असून विनोद चौरसिया यांनी या चित्रपटातील दृश्यांचं संकलन केलं आहे. नितीन पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.