Join us  

निर्मिती सावंत यांचं खरं नाव काय माहितीये का? वडिलांना कळू नये म्हणून केला होता बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 6:11 PM

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत केला नावाचा खुलासा

'गंगूबाई नॉनमॅट्रिक' नाटक, मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री निर्मिती सावंत सर्वांच्या लाडक्या आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांनी सर्वांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. नाटक, सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'झिम्मा' या गाजलेल्या सिनेमातूनही निर्मिती सावंत यांनी स्वत:ची वेगळी छाप पाडली. नंतर 'झिम्मा 2' मध्येही त्यांच्या भूमिकेमुळे धमाल आली. नुकतंच निर्मिती सावंत यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या खऱ्या नावाचा खुलासा केला. 

निर्मिती सावंत यांचं खरं नाव मधुमती देसाई आहे. त्या म्हणाल्या, "मधुमती देसाई ही एक मध्यमवर्गीय सर्वसाधारण मुलींसारखीच होती. आताही ती तशीच आहे. पण त्यावेळेस मधुमती देसाई म्हणून मला वाटलंही नव्हतं की ती नाटक, सिनेमा करेल. मी कबड्डी खेळायचे. तेव्हा मी एकांकिका स्पर्धेतही भाग घ्यायचे. माझा तेव्हा होणारा नवरा आमची एकांकिका बसवायचा. मध्यमवर्गीय असल्याने वडिलांनी सांगितलं होतं सासरी गेल्यावर काय हवं ते कर. त्यामुळे वडिलांना माहित नव्हतं मी एकांकिका करते फक्त आईला ठाऊक होतं. एकदा वर्तमानपत्रात मला अवॉर्ड मिळाल्याची बातमी आली. ती बाबांनी पाहिली. त्यांनी विचारलं तू काम केलं होतंस? मी घाबरले. मग आईने आधार दिला. ती बाबांना म्हणाली की तीच भाग घेणार होती तुम्ही नको म्हणाल्यानंतर तिने माघार घेतली आणि दुसऱ्या मुलीने ते काम केलं. पण नाव मधुचंच आलं."

"एकांकिका करणं ही तेव्हा झिंग असायची. मग बाबांना कळू नये म्हणून होणाऱ्याने नवऱ्याने मला निर्मिती सावंत हे नाव दिलं. मग काही वर्ष त्याच नावाने काम केलं. लग्नानंतर मी अधिकृतरित्या निर्मिती सावंत नाव करुन घेतलं. पण मी निर्मिती सावंत म्हणून काही फार बदलले नाही."

निर्मिती सावंत सध्या 'आजीबाई जोरात' नाटकात काम करत आहेत. यामध्ये लक्ष्याचा मुलगा अभिनय बेर्डेही आहे.  या नाटकाची उद्घोषणा ही AI चा वापर करुन लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या हे नाटक चर्चेत आहे. इतक्या वर्षांनी लक्ष्याचा आवाज ऐकून चाहते भावूक झालेत. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटसेलिब्रिटी