सध्या चंदेरी दुनियेत बायोपिक बनविण्याची क्रेझ आहे. सुलतान, एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी, रईस, दंगल यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील बायोपिक पाहायला मिळणार असल्याचे यापूर्वी लोकमत सीएनएक्सने सांगितले होते. हा बायोपिक डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर असणार आहे. तसेच या चित्रपटात अलका कुबल असून डॉ. तात्याराव लहाने यांची भूमिका अभिनेता मकरंद अनासपुरे करणार असल्याचे देखील यापूर्वी सांगितले होते. आता या दोन दिग्गज कलाकारांसोबत या चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निशिंगधा वाडदेखील पाहायला मिळणार असल्याचे कळते. अर्थातच, अलका कुबल व निशिगंधा वाड या दोन दिग्गज अभिनेत्रींचा अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्रित पाहण्याची संधी मिळेल. या चित्रपटात अलका कुबल या डॉ. तात्याराव लहाने यांच्या आईची भूमिका करताना पाहायला मिळतील. निशिगंधा वाड या कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत हे अद्यापही कळाले नाही. डॉ. तात्याराव लहाने हे व्यक्तिमत्त्व सर्वांनाच माहित आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेक विक्रम केले आहेत. अत्यंत गरिबीतून हा माणूस वर आलेला आहे. त्यांच्या या यशस्वी करिअरमध्ये आई, भावंडे यांचे खूप मोठे योगदान आहे. अशा या व्यक्तीमत्त्वावर बायोपिक येत असल्याने प्रेक्षकदेखील नक्कीच उत्सुक असतील. डॉ. प्रकाश आमटे यांच्या चित्रपटानंतर आता डॉ. तात्याराव लहाने यांचे बायोपिक हे नक्कीच समाजाला आदर्श घालू पाहणारे आहे.
Attachments area