Join us

नितीन देसाई यांची अकाली एक्झिट; लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे काम अपूर्ण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 1:29 PM

नितीन देसाई दरवर्षी लालबागच्या राजाचा देखावा उभारायचे. यंदा ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा उभारणार होते.

Nitin Desai Suicide News: राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी त्यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओत आत्महत्या केली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी स्टुडिओतच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास केला जात आहे. 

नितीन देसाई करोडो रुपयांच्या मेगा बजेट चित्रपट आणि टीव्ही मालिका बनवायचे, तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शनाचे कामही केले आहे. उत्कृष्ट कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटातील सेटसोबतच नितीन देसाई दरवर्षी मुंबईतील 'लालबाग चा राजा' (Lalbaugcha Raja) गणपतीसाठी आकर्षक देखावा उभारायचे. यावर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा उभारण्याचे काम सुरू केले होते.

कला दिग्दर्शनासाठी आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित

गेल्या वर्षी त्यांनी राममंदिराचा देखावा उभारला होता. महिनाभरापूर्वीच त्यांनी लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे सुरू केले होते. यावर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा उभारण्याची योजना आखली होती. सुमारे 349 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. नितीन देसाईंना तो सोहळा पुन्हा लोकांमसमोर आणायचा होता.

लालबागच्या राजाचे काम अपूर्णपण, नितीन देसाई यांच्या अकाली जाण्याने लालबागच्या राजाच्या देखाव्याचे काम अपूरे राहिले आहे. गणपतीच्या आगमनाला अवघे 45 दिवस उरले आहेत. अशा स्थितीत या सेटचे काम कोण आणि कसे पूर्ण होणार, हा प्रश्न ‘लालबाग चा राजा’च्या टीमसमोर आहे. लालबागच्या राजासाठी देखावा उभारला जाईलच, पण नितीन देसाईंच्या जाण्याने सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईमृत्यूमराठी चित्रपटकर्जतलालबागचा राजा