सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्टला आत्महत्या केली. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला होता. देसाईंनी कोट्यवधींचं कर्ज घेतलं होतं. कर्जवसुलीच्या तगाद्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नीने पोलिसांत एडलवाईज कंपनीतील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. तर त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्याचं कंपनीचं म्हणणं होतं. आता नितीन देसाईंच्या जवळच्या व्यक्तीकडून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
नितीन देसाईंचे मित्र नितीन कुलकर्णी यांनी नुकतीच ‘ईटाइम्स’शी बातचीत केली. यावेळी त्यांनी देसाईंवर कंपनीचा दबाव होता, असा खुलासा केला आहे. “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. नितीन देसाईंची पत्नीदेखील एन.डी.स्टुडिओच्या संचालक आहेत. कर्जवसुलीसाठी कंपनीकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाणार नाही, यासाठी मी विनंती करणार आहे. दिल्लीवरुन परतल्यानंतर नितीन देसाईंनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी स्टुडिओ वाचवण्यासाठी प्रयत्न केले. नितीन देसाईंवर कंपनीकडून दबाव टाकला जात होता. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली”असं ते म्हणाले.
तिप्पट टोलवसुलीनंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे ऋजुता देशमुख पुन्हा त्रस्त, म्हणाली, “नाटकाची बस...”
“६ ऑगस्टला नितीन देसाईंचा वाढदिवस होता. त्यांच्या मुली आणि पत्नीने वाढदिवस साजरा करण्याची संपूर्ण तयारीही केली होती. पण, यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही, असं देसाईंनी सांगितलं होतं. वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णयामागे असं काहीतरी असेल, असं त्यांच्यापैकी कोणालाही वाटलं नव्हतं,” असंही कुलकर्णींनी पुढे सांगितलं.
“माझे बाबा कुणालाही फसवणार नव्हते”, नितीन देसाईंच्या निधनानंतर मुलीची पहिली प्रतिक्रिया
नितीन देसाईंनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘अजिंठा’, ‘लगान’ अशा सुपरहिट चित्रपटांचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. बॉलिवूडमध्ये त्यांचं मोठं नाव होतं. त्यांनी १८१ कोटींचं कर्ज घेतलं होतं, असा खुलासा मुलीने केला होता. त्यापैकी ८६ कोटींच्या कर्जाची परतफेड केल्याचंही नितीन देसाईंच्या मुलीने सांगितलं होतं.