आटपाडी नाईट्स' या आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी तमाम मराठी चित्रपट रसिकांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. संवेदनशील विषयाला हास्याची झालर देत त्यांनी केलेला 'जांगडगुत्ता' मराठी रसिकांच्या मनाला भावाला. दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आता त्यांच्या दुसऱ्या चित्रपटातून एक हटके कथानक घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांचे नाव 'सरला एक कोटी' असून हा एक मल्टीस्टारर बिग बजेट मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती सानवी प्रॉडक्शन हाऊसने केली आहे.
दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्या 'आटपाडी नाईट्स' या चित्रपटाला तब्बल सहा 'झी चित्र गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या 'राज्य मराठी चित्रपट पुरस्कार'च्या नामांकनांमध्ये दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांना प्रथम पदार्पण पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे.
'सरला एक कोटी' या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर म्हणाले, 'आटपाडी नाईट्स' या माझ्या दिग्दर्शक म्हणून असलेल्या पहिल्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्याला पुरस्कारांची जोड मिळाली. यामुळे नवीन कलाकृती घेऊन येताना माझ्यावर अधिक जबाबदारी वाढल्याचे मला जाणवले. मराठी प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा 'सरला एक कोटी' मधून नक्की पूर्ण होतील असा विश्वास वाटतो. चित्रपटाची कथा, चित्रपटातील कलाकार कोण आहेत? ही जाणून घेण्यासाठी रसिकांना अजून थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, सानवी प्रॉडक्शन हाऊसचा हा दूसरा चित्रपट घेऊन येताना आम्हाला आनंद होत आहे. 'सरला एक कोटी' चे चित्रीकरण आम्ही नुकतेच सुरू केले आहे. आमची पहिली निर्मिती असलेला 'दिशाभूल' मध्ये युवा आणि दिग्गज कलाकरांच्या भूमिका असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर 'सरला एक कोटी' मध्येही मराठीतील नामवंत कलाकार आहेत, आमचे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतील असा आम्हाला विश्वास आहे.