Nivedita Saraf on Ashok Saraf Padma Shri: हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. नायक, खलनायक, विनोदी, चरित्र अशा सर्वच भूमिका त्यांनी अगदी चोखपणे बजावल्या. अशोक सराफ यांच्या सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' (Ashok Saraf Padma Shri Award) या प्रतिष्ठित पुरस्काराने सम्मानित केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'एबीपी माझा'शी संवाद साधताना निवेदिता म्हणाल्या, "मी खूप आभारी आहे. हा एकट्या अशोकचा सन्मान नाहीये. हा महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा सन्मान आहे. कारण, त्यांनी नेहमी अशोकवर प्रेम केलं, त्यांच्या अभिनयावर प्रेम केलं. इतक्या वर्षांची त्यांची जी अविरत मेहनत आहे, त्यांनी एकाग्रतेने अभिनयच केला. त्या सगळ्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची, महाराष्ट्राच्या जनतेची आणि केंद्र सरकारची खूप ऋणी आहे. आम्हा कुटुंबीयांसाठी ही खूपच आनंदाची बाब आहे".
पुढे त्या म्हणाल्या, फक्त माशाचा डोळा दिसतो असं म्हणतात, त्याप्रमाणे अशोक यांना फक्त आणि फक्त अभिनयच दिसतो. आयुष्यात त्यांनी कधी दुसरं काहीच बघितलं नाही. त्यांचं कधी पैसे कमावणं हे देखील उद्दिष्ट नव्हतं. ते नेहमी सगळ्या प्रेक्षकांना देवासमान मानलंय. ते म्हणतात, मी जगात काहीही करु शकतो पण, माझ्या प्रेक्षकांना मी कधीच फसवू शकत नाही. त्यामुळे एवढी वर्षे त्यांनी केवळ प्रामाणिकपणे आपलं काम केलं. भूमिका छोटी असो, मोठी असो".