ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ (Nivedita Saraf) आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) या जोडीनं अनेक सिनेमे गाजवले. नाटकं गाजवलीत. लक्ष्मीकांत बेर्डे हे निवेदिता यांचे बालपणीचे मित्र. बालरंगभूमीवर दोघांनी काम केलं. पुढे ही जोडी अनेक सिनेमात एकत्र दिसली. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांच्यात खूप चांगलं बॉंडिंग होतं. अगदी निवेदिता लग्न झाल्यावर लक्ष्मीकांत यांच्या घराशेजारी 10 वर्षे राहत होत्या. लक्ष्या सारख्या सच्च्या मित्राला निवेदिता विसरूच शकत नाहीत. वेळोवेळी आपल्या या बालमित्राच्या अनेक आठवणी निवेदिता सांगताना दिसतात.
आज अशीच लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणीत त्यांनी त्यांच्या खास आवडीची एक डिश बनवून दाखवली आहे. होय, निवेदिता यांचं युट्यूबवर रेसिपीज्चं चॅनल आहे. या चॅनलवरचा एक रेसिपीचा व्हिडीओ निवेदिता यांनी शेअर केला आहे. सोबत लक्ष्मीकांत यांची एक आठवणही.ही आठवण सांगत असताना निवेदिता सराफ म्हणतात की, ‘लक्ष्यासोबत मी अनेक नाटकात, सिनेमात काम केलंय. त्याला एक डिश अतिशय आवडती होती. सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणात, संध्याकाळी चहाच्यावेळी आणि रात्रीच्या जेवणावेळी अशी कधीही ही डिश खायची त्याची तयारी असायची, ती म्हणजे खोबऱ्यातली सुरमई.
निवेदिता जोरात किंचाळल्या आणि त्यांनी फोन कट केला...एका मुलाखतीत निवेदिता यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची अशीच एक आठवण शेअर केली होती. लग्नाआधी नाटकाच्या दौऱ्यानिमित्त रात्री अपरात्री घरी जायला खूप उशीर होणार असेल तर निवेदितांचा मुक्काम लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी असायचा. एकदा असाच उशीर होणार असल्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या घरी त्या मुक्कामाला होत्या.
मी लक्ष्याच्या घरी आहे हे कळविण्यासाठी निवेदिता यांनी आईला फोन केला. पलीकडून आईने फोन उचलल्यावर ‘मी लक्ष्याच्या घरी आहे, असं आईला सांगत असतानाच समोर मोठ्ठ झुरळ दिसल्यानं निवेदिता जोरात किंचाळल्या आणि त्यांनी फोन कट केला. यावर, तू माझ्या घरी आहेस एवढंच सांगितलंस आणि किंचाळलीस... तुझ्या आईला काय वाटेल, असं लक्ष्मीकांत म्हणाले. मग काय निवेदिता यांनी लगेच पुन्हा आईला फोन केला आणि सगळी हकीकत ऐकवली...