तुम्हा आम्हा सर्वांचे लाडक अशोक मामा अर्थात अशोक सराफ (Ashok Saraf) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सुमारे 5 दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अशोक मामांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. अशोक सराफ बहुगुणी आहेत, बहुरूपी आहे. पण त्यांचे एक टॅलेंट कदाचित तुम्हाला ठाऊक नसावं. होय, अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या निमित्ताने अशोक मामांचं एक टॅलेंट जगाला कळलं आहे.
होय, अशोक सराफ यांनी लिहिलेलं ‘मी बहुरुपी’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. या पुस्तकातून अशोक सराफ यांचा चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांचा प्रवास उलगडणार आहे. याच पुस्तकाच्या निमित्ताने अशोक सराफ यांचं नवं छुपं टॅलेंट सर्वांना कळलं. होय, निवेदिता यांनी या पुस्तकावर अशोक सराफ यांनी दिलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अशोक सराफ तबला वादन करताना दिसत आहेत. अशोक मामांनी तबल्यावर चांगलाच ठेका धरलेला पाहायला मिळत आहे.
अशोक मामांना तबला वादन करताना पाहून सर्वांनाच मोठा सुखद धक्का बसला. कारण आजवर त्यांचं हे टॅलेंट कधी जगापुढे आलंच नव्हतं. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोनेनं ‘आईशप्पथ’ म्हणत मामांचं कौतुक केलंय. बहुगुणी कलाकार, मामा इज द ग्रेट, क्या बात है' अशा कमेंट करत चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. व्हिडीओत अशोक मामांना तबला वादनात अभिनेता विघ्नेश जोशी यानं साथ दिली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता विघ्नेश जोशी पेटी वाजवताना दिसतोय तर अशोक मामांनी तबल्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळतयं.