मराठी चित्रपट सृष्टीतील कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी गेल्या शनिवारी (3 जुलै)आत्महत्या केली. (Art Director Raju Sapte's suicide)मनोरंजनविश्वातील कामगार संघटनांच्या पदाधिका-यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. साप्ते यांच्या निधनाच्या बातमीनं अख्खी मराठी चित्रपटसृष्टी हादरली आणि यानंतर राजू साप्ते यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटली. काहींनी सोशल मीडियावर राजू साप्ते यांना न्याय देण्याची मागणी करत पुढाकार घेतला.आता ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी देखील एक व्हिडीओ शेअर करत साप्ते यांना न्याय मिळवून देण्याची मागणी पुढे रेटली आहे. अतिशय गुणी आणि सज्जन कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. राजू साप्ते यांना न्याय द्या, मी मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती करते, अशी मागणी निवेदिता यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
आज हा व्हिडिओ शेअर करताना मला अतिशय दु:ख होतंय. आमचे कलादिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली. इतक्या टॅलेंटेड, मितभाषी आणि मनमिळावू माणसाला हे इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? अग्गंबाई सूनबाई या मालिकेच्या निमित्तानं राजू सापते यांच्या संपर्कात आले होते. ते फारच टॅलेन्टेड होते. अवघ्या तीन ते चार दिवसांत त्यांनी आमच्या मालिकेचा सेट उभा केला होता. राजू यांना न्याय मिळायलाच हवा. त्यांनी ज्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, त्यांचा शोध घ्यायला हवा.माझी सर्व संबंधित व्यक्तींना, मुख्यमंत्र्यांना, राज ठाकरे आणि अमेय खोपकरांना कळकळीची विनंती आहे, की. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, जी काही कीड लागलीये, ती समूळ उखडून टाकली पाहिजे, असं त्यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.