अभिनेत्री नेहा खान सध्या देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत एसीपी दिव्या सिंगची दमदार भूमिका साकारत आहे. नेहा खानने शिकारी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नेहाचा बालपणापासूनचा प्रवास फारच खडतर होता. तिला इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले होते.
नेहा खान मूळची अमरावतीची. तिची आई मराठी तर वडील मुस्लिम त्यामुळे दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता. नेहाच्या वडिलांचे अगोदरच दोन लग्नही झाली होती तरीही एकमेकांवरील प्रेमामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. संपत्तीचे वाटेकरी नकोत म्हणून नेहाच्या वडिलांची दुसरी पत्नी नेहाच्या आईवर दबाव आणत असे यातूनच नेहाच्या आईने आपल्या मुलांसह वेगळे राहणे पसंत केले होते. दरम्यान आईला मारण्यासाठी तिने गुंडही पाठवले होते. या घटनेत नेहाची आई रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती तिला दवाखान्यात दाखल केल्यावर संपूर्ण शरीरावर ३७० टाके घालण्यात आले त्यामुळे तिचा केवळ एकच डोळा उघडा दिसत असल्याचे पाहून नेहा आणि तिचा भाऊ खूपच घाबरून गेले होते. एवढ्या बालवयात या दोघा चिमुरड्यानी लोकांकडून पैसे गोळा करून आईवर उपचार केले. जवळपास दोन वर्षे अंथरुणाला खिळून असलेली तिची आई आणि त्यातच वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे उदारनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी नेहा आणि तिच्या भावाने मिळेल ती कामे करण्यास सुरुवात केली पेपर वाटणे, लोकांच्या घरची धुणीभांडी करून या दोघांनी आपल्या आईला दुःखातून बाहेर काढले. त्यानंतर आईनेही लोकांच्या घरची धुणीभांडी करण्यास सुरुवात केली, मेस चालवली. थोडे पैसे जमा झाल्यावर एक म्हैस..मग दोन म्हैस खरेदी करून संसाराचा गाडा सुरळीत चालवला. मात्र म्हशीचे दूध काढणे, शेण काढण्याची जबाबदारी नेहावर येऊन पडली.