Join us

राजेश खन्नाच नाहीतर आता 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावरही येणार बायोपिक, लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 7:09 PM

राजकारण, क्रीडा अशा क्षेत्रांवर बायोपिक बनवले जात आहेत, याशिवाय फिल्म स्टार्सवरही बायोपिक बनवले जात आहेत. यामध्ये सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यावरही बायोपिक बनणार आहे.

चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. कारण ज्या व्यक्तीवरील चित्रपट असतो त्याच्या प्रतिमेला धक्का लागू नये अशी प्रत्येकाची भावना असते. राजकारण, क्रीडा अशा क्षेत्रांवर बायोपिक बनवले जात आहेत, याशिवाय फिल्म स्टार्सवरही बायोपिक बनवले जात आहेत. यामध्ये सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यावरही बायोपिक बनणार आहे. यानंतर या यादीत आणखी एका अभिनेत्याच्या नावाची चर्चा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांच्यावर आता बायोपिक बनणार असल्याची माहिती समोर येतेय.

 

रमेश तौरानी त्यांच्यावर बायोपिक बनवणार असल्याचे समजतंय. रमेश तौरानी यांनी निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून चित्रपट बनवण्याचे अधिकार घेतले आहेत. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.रमेश तौरानी यांचा हा दुसरा बायोपिक असेल. याआधी, त्यांनी अजय देवगणसोबत 'द लिजेंड ऑफ भगतसिंग' बनवला होता. 

निळू भाऊ अर्थात निळू फुले त्यांच्या आवाजात भारदस्तपणा होता. घोगर्‍या, बसक्या आवाजातून फुटणारा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणार्‍या तटस्थ प्रेक्षकाच्या मनालाही भितीच्या कवेत घेऊन यायचा. ही ओळख होती निळू भाऊ अर्थात निळू फुले यांच्या असामान्य अभिनय क्षमतेची. त्यांची बेरकी नजर प्रेक्षकांच्याही आरपार जायची. हीच नजर, सूचक हावभाव आणि संवाद हे निळू फुले यांचं खरं बलस्थान होतं. काही कारणासाठी निळूभाऊ गावोगाव गेल्यानंतर तिथल्या शिक्षिका, नर्स त्यांच्यापासून चार हात दूर रहायच्या. ही त्यांच्या अभिनयाला खरी पावती होती. 

निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला . घरात 11 बहिण भाऊ, त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणा-या पैशांवर चरितार्थ चालवत होते . लहानपणापासूनच निळूभाऊंच्या अंगात खोडकरपणा होता. बहिणींची ते खोड काढायचे मात्र त्यांच्यावर तितकंच प्रेमही होतं. बालपणापासूनच निळूभाऊंना अभिनयाची प्रचंड आवड होती.

 

आपली अभिनय करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः १९५७ मध्ये ' येरा गबाळ्याचे काम नोहे ' हा वग लिहिला . त्यानंतर पु . ल . देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे ' ची भूमिका साकारुन त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले . मात्र ' कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिका आणि सखाराम बाईंडरमुळे ते खर्‍या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले. अनेक नाटक आणि सिनेमात त्यांनी विविधरंगी भूमिका साकारल्या. सिंहासनमधला पत्रकार आणि विनोदी भूमिकाही त्यांनी खुबीने वठवल्या. मात्र रसिकांना त्यांचा खलनायकच भावला. 

टॅग्स :राजेश खन्नानिळू फुले