बारायण चित्रपटाच्या निमित्ताने एकाकी घराला गवसलं घरपण!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 10:02 AM
प्रत्येकाच्या स्वप्नातलं एक घर असत. जवळच असलेल्या रखवालदार किल्ल्याला तिन्ही बाजूने वेढून आळसावल्यागत शांतपणे पहुडलेला समुद्रकिनारा. नारळी पोफळीच्या सावलीतून घराची वाट दाखवणारा रस्ता. ...
प्रत्येकाच्या स्वप्नातलं एक घर असत. जवळच असलेल्या रखवालदार किल्ल्याला तिन्ही बाजूने वेढून आळसावल्यागत शांतपणे पहुडलेला समुद्रकिनारा. नारळी पोफळीच्या सावलीतून घराची वाट दाखवणारा रस्ता. सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुद्धा गावाचा फील देणार, आपलं वाटणाऱ्या घराच स्वप्न तुम्हाला बारायण चित्रपटात पाहायला मिळेल. कौलसुधा नसलेलं वीस वर्षांपेक्षाही जास्त काळ पडीक असलेल घर, जिथे भुते राहतात असा शेजाऱ्यांचा अजूनही समज आहे, त्या घराला घरपण देऊन बारायणच्या कुटुंबाने माया लावली. इथेच सिनेमामध्ये आईची भूमिका करणाऱ्या प्रतीक्षा लोणकर यांच्यावर एक गाण चित्रित केले आहे. गाण्याचे बोल आहेत ‘घर एकाकी’ जे अलका याज्ञिक यांच्या गोड आवाजातून मराठी रसिकांचे मन मुग्ध करतात. तब्बल दहा वर्षानंतर त्यांनी मराठीत गाण गायले आहे. मुलगा ‘अनिरुद्ध’ पुढच्या शिक्षणासाठी जेव्हा बाहेर जातो तेव्हा आईच्या मनाला आठवणींच्या विळख्यात गुरफटून टाकणाऱ्या या गाण्याचे स्वर इतके मधुर आणि मनात घर करणारे आहेत की डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. घरातील माणसांप्रमाणे आपलं घरही आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो हे दुरावा निर्माण झाल्यावर अनिरुद्ध ला समजत आणि त्याच्या डोळ्यांतून दिसत. माया लावणारे घर आणि जीव लावणारी माणसे यांची गोष्ट बारायण सिनेमामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या १२ जानेवारीला शायना एन सी प्रस्तुत, दैवता पाटील यांच्या ओंजळ आर्ट्स निर्मित आणि दीपक पाटील यांच्या खुमासदार शैलीत दिग्दर्शित ‘बारायण’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात पाच वेगवेगळ्या धाटणीची अर्थपूर्ण गाणी असून दैवता पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाबाबत आपण आशावादी असल्याचे सांगत समाजात कोणत्याही आर्थिक स्तरात वावरताना विनम्रता किती आवश्यक आहे हा संदेश अप्रत्यक्षपणे देणारा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असेही दैवता पाटील यांनी सांगितले. या चित्रपटात अनुराग वरळीकर, संजय मोने, वंदना गुप्ते, ओम भुतकर, कुशल बद्रिके, उदय सबनीस, समीर चौगुले, प्रभाकर मोरे, प्रसाद पंडित, निपुण धर्माधिकारी, श्रीकांत यादव, रोहन गुजर, प्रार्थना बेहेरे यांच्याही भूमिका आहेत. संपूर्ण कुटुंबासह बघता येणारा आणि सहज सोप्या पद्धतीने अंतर्मुख करणारा हा चित्रपट असल्याचे यावेळी कलाकरांनी सांगितले.