Join us

नावीन्याचा ध्यास घेऊन परतले जुने चेहरे; ५ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत सचिन पिळगावकर

By संजय घावरे | Published: April 04, 2024 8:13 PM

७५व्या वर्षी विजय कोडकेंचे कमबॅक; पाच वर्षांनी पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत सचिन पिळगावकर

मुंबई - 'जुने ते सोने' म्हणत नेहमीच जुनेच काहीसा नवीन साज लेऊन समोर येत असते. नावीन्याचा ध्यास घेऊन मनोरंजन विश्वातील काही जुने चेहरेही परतले आहेत. सई परांजपे यांचे नाटक आणि कांचन अधिकारींच्या चित्रपटानंतर सचिन पिळगावकर आणि विजय कोंडके यांच्या सिनेमांची उत्सुकता आहे.

एकीकडे ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी १३ वर्षांनी पुनरागमन करत 'इवलेसे रोप' हे नवे नाटक मराठी रंगभूमीवर आणले आहे, तर दुसरीकडे कांचन अधिकारींनी आठ वर्षांनी कमबॅक करत दिग्दर्शित केलेला 'जन्म ऋण' हा चित्रपट मागच्या महिन्यात रिलीज झाला आहे. या मागोमाग आणखी काही निर्माते-दिग्दर्शक बऱ्याच वर्षांनी पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सचिन पिळगांवकर आणि विजय कोंडके यांचेही सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २०१९मध्ये रिलीज झालेल्या 'अशी हि आशिकी' चित्रपटानंतर पाच वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळलेले निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर सध्या 'नवरा माझा नवसाचा २' बनवण्यात बिझी आहेत. पिळगावकर २० वर्षांनी 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा सिक्वेल बनवत आहेत. यात अशोक सराफ, स्वप्नील जोशी, निर्मिती सावंत, हेमल इंगळे, अली असगर, निवेदिता सराफ, संतोष पवार, वैभव मांगले, जयवंत वाडकर, सुप्रिया पिळगावकर आदी कलाकारांच्या भूमिका असल्याचे समजते. या चित्रपटात पिळगावकरांनी संतोष पवारच्या साथीने कोणती गंमत केली ते पाहायचे आहे.

१९९१मध्ये सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या 'माहेरची साडी'चे निर्माते-दिग्दर्शक विजय कोंडके ३४ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले आहेत. वयाच्या ७५व्या वर्षी कमबॅक करणाऱ्या कोंडके यांनी 'माहेरची साडी'चा सिक्वेल न बनवता 'लेक असावी तर अशी' चित्रपट बनवला आहे. यात गार्गी दातार, प्रीतम भंडारी हि जोडी मुख्य भूमिकेत आहे. दादा कोंडके यांच्या 'सोंगाड्या', 'पांडू हवालदार', 'बोट लावीन तिथं गुदगुल्या', 'तुमचं आमचं जमलं', 'राम राम गंगाराम', 'आली अंगावर' आदी चित्रपटांच्या वितरणात विजय कोंडकेंचा मोलाचा वाटा आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून चित्रपट निर्मिती करण्यात तरबेज असलेले विजय कोंडके 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, ३४ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शनाकडे वळण्यापूर्वी बऱ्याच कथा वाचल्या. त्यातून नवीन्यपूर्ण कथानकाची निवड केली. पूर्वी सोबत काम केलेले बरेच कलाकार-तंत्रज्ञ आज नाहीत आणि जे आहेत ते सक्रिय नाहीत. त्यामुळे नवीन पिढीसोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मैत्री करून सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आवडेल असा सिनेमा बनवण्याचे आव्हान होते. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांच्या साथीमुळे कुठेही अडचण भासली नाही. 

टॅग्स :मुंबईसचिन पिळगांवकर