Join us

शिवजंयती निमित्त 'राजे दैवत हो’ शिवगीत प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 14:20 IST

श्रीकांत पंडित व श्रद्धा हिंदळकर या गायकांनी हे गीत गायले असून संदीप पालेकर यांनी गीत स्वरबद्ध केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘राजे दैवत हो’ हे शिवगीत नुकतेच शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृहात प्रदर्शित झाले. युवराज सणस आणि हर्षद सुर्वे यांची निर्मिती असून छत्रपती शिवाजी  महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला त्यांना समजणाऱ्या समाज माध्यमातून कळावा या गीताचा उद्देश आहे.

कोणतीही नवीन कलाकृती ही आपल्या दैवतास अर्पण करण्याची आपली संस्कृती आहे. कला क्षेत्रात सांघिक रुपाने नवोदित युवा कलाकारांची ‘राजे दैवत हो’ ही पहिलीच कलाकृती आहे. शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या मराठीजणांचं आराध्य दैवत. म्हणून या नवोदित कलाकारांनी आपली ही पहिली सांघिक कलाकृती महाराजांना अर्पण केली आहे.

श्रीकांत  पंडित  व श्रद्धा  हिंदळकर या गायकांनी हे गीत गायले असून संदीप पालेकर यांनी गीत स्वरबद्ध केले आहे.  व्यंकटेश गावडे हे या गीताचे गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. रोहित आयरे यांनी गीताचे चित्रण केले असून प्रतिक फणसे यांनी संकलन केले आहे. गणेश  गुरव, नयन दळवी, पूजा  मौली, अमरजा  गोडबोले या कलाकारांवर हे गीत चित्रीत झाले आहे.

स्वराज्याचे  सुराज्य  कसे  घडेल  यासाठी  आजच्या  तरुणाने  महाराजांचे  कोणते  विचार  अंगिकारले  पाहिजे  याचे  अचूक  चित्रीकरण  या गाण्यात  केलेले  आहे. निर्मात्यापासून ते कलाकारांपर्यंत या गीताशी संबंधित सगळी टीम ही नवोदित आणि तरुण आहे, हे या गीताचे वैशिष्ट्य आहे.

शिवाजी महाराजांना वाहिलेले कलेचे हे पहिले पुष्प मस्तकला क्रिएशन्स या युट्यूब वाहिनीवर प्रदर्शित झाले. गाणे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन या युवा कलाकारांनी केले आहे.