Join us

'हडळ' या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न, स्मिता तांबे व अरविंद जगताप यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 6:06 PM

'हडळ' चित्रपटाची कथा कोकणच्या निसर्गरम्य भूमीत घडणारी आहे.

ठळक मुद्दे राजेश-दिनेश ही जोडी ‘हडळ’मधून मराठी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.

शीर्षकावरून 'हडळ' हा जरी भयपट वाटत असला तरी हा सिनेमा भयावह नसून क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत समज-गैरसमजांच्या कक्षा ओलांडणारा आहे. ‘आर. डी. फिल्म्स प्रोडक्शन’ अंतर्गत निर्माते राजेश-दिनेश ही जोडी 'हडळ' मधून मराठी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. दिग्दर्शक राकेश भारद्वाज या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून कथा, पटकथा आणि संवादलेखन राकेश बबन दुर्योधन यांनी केले आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या सोहळयाला सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.'हडळ' चित्रपटाची कथा कोकणच्या निसर्गरम्य भूमीत घडणारी आहे. कोकणाचे निसर्ग सौंदर्य आहेच, पण त्या जोडीला एक सशक्त कथानकही आहे. त्याला श्रवणीय संगीताची किनार जोडण्यात येईल. याला विनोदाची झालरही असणार आहे, त्यामुळे  सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी हा सिनेमा मनोरंजनाचे पॅकेज ठरेल असे दिग्दर्शक राकेश भारद्वाज तसेच राजेश आणि दिनेश या निर्माते द्वयींचे म्हणणे आहे.मिलिंद शिंदे, संजय खापरे, विद्याधर जोशी, वर्षा धांदळे, अशोक कुलकर्णी, अभिषेक भामरे हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नजीर खान या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. या चित्रपटातील गीते सावता गवळी यांची असून संगीतकार संदिप डांगे या गीतांना संगीतबद्ध करणार आहेत. कुमार नीरज या सिनेमाचे संकलक असून समीर शिंदे कार्यकारी निर्माते आहेत. देवेंद्र तावडे यांनी प्रोडक्शन डिझाईन केले असून मेराज शेख प्रोडक्शन मॅनेजर आहेत. मेकअप विजय पंडित, केशभूषा अपर्णा जाधव तसेच अतुल मर्चंडे प्रोडक्शन कंट्रोलरची जबाबदारी पार पाडणार आहेत.