आपल्या दैवी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे, नाना प्रकारच्या गायन शैली आत्मसात असलेले भारत रत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांवर गारुड केले. त्यांच्या सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत संगीतप्रेमींच्या पिढ्यानपिढ्या सुरात न्हाऊन निघाल्या. या पट्टीच्या स्वरभास्कराने भारतीय शास्त्रीय संगीताला आपल्या स्वरांनी परिसस्पर्श केला. शास्त्रीय गायन शैली सामान्य घरांमध्ये पोहोचविण्यात जोशीबुवांची भूमिका मोलाची ठरली.
यंदा या महान संगीत सम्राटाचे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या अजरामर सुरावटी आणि गायन वारसा साजरा करण्याचे औचित्य लाभले. रित्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने नाट्य संगीत, अभंग आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा जलसा ‘स्वरभास्कर १००’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता, दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होईल. तर गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१ रात्री ८ वाजता सांगता होणार आहे. या स्वरमय जलशाची डोनेशन कार्ड www.bookmyshow.com वर उपलब्ध असतील.
स्वरभास्कर १०० च्या माध्यमातून पंडित भीमसेन जोशींना समृद्ध आणि तजेलदार सूरमयी वंदना देण्यात येईल. त्याकरिता मंचावर किराणा घराण्याचे दोन दिग्गज, किर्तीमान गायक आनंद भाटे आणि जयतीर्थ मेवुंडी आपल्या स्वरांनी बहार आणणार आहेत. आनंद भाटे यांना प्रेमाने ‘आनंद गंधर्व’ संबोधले जाते. पंडित भीमसेन जोशी यांच्या लोकप्रिय शिष्यांपैकी ते एक आहेत. दिनांक ३ फेब्रुवारी रोजी आनंद भाटे गायन सादर करतील.
तर पंडित भीमसेन जोशी यांचे अतिशय वरिष्ठ शिष्यगण श्री. श्रीपती पागेदार यांच्या तालमीत स्वरांची दीक्षा घेतलेले जयतीर्थ मेवुंडी ४ फेब्रुवारी रोजी रसिकांसमोर कला प्रस्तुत करणार आहेत. हे दोन्ही शिष्य महारथी पंडितजींच्या रचना यावेळी सादर करतील. त्याशिवाय या सांगीतिक मेजवानीत भरत कामत, मंदार पुराणिक, सुयोग कुंडलकर, निरंजन लेले, सुखद मुंडे, सूर्यकांत सुर्वे आणि वरद कथापुरकर हे सहकलाकारही असणार आहेत. यावेळी आनंद भाटे आणि जयतीर्थ मेवुंडी हे निवडक नाट्यसंगीत, अभंगांच्या सोबतीने पंडित भीमसेन जोशी यांचे शुद्ध कल्याण, मियां की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भीमपलासी, दरबारी, मालकंस, अभोगी, ललित, यमन यासारखे आवडते अवीट गोडीचे राग सादर करतील.