संजय घावरे
मुंबई : मनोरंजन विश्वातील सध्याचे चित्र कही खुशी कही गम असेच काहीसे आहे. एकीकडे ओटीटीचे दर वाढूनही युझर्सची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, तर दुसरीकडे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहांच्या दिशेने वळेनासी झाली आहेत. या सर्वांमध्ये नाट्यसृष्टी मात्र खंबीरपणे तग धरून वेळप्रसंगी नुकसान सहन करूनही रसिकांच्या सेवेचे व्रत जपण्याचे काम करत आहे.
सध्याचा काळ ओटीटीचा असून, मनोरंजन विश्वावर ओटीटीने पकड मजबूत केली आहे. रसिकांना ओटीटीची इतकी सवय लागली आहे की, दर वाढवूनही बिझनेसवर परिणाम झालेला नाही. सर्वच ओटीटी प्लॅटफॅार्म्सनी आपले दर वाढवलेले नाहीत. काहींनी वाढवले, पण त्या बदल्यात दर्जेदार कंटेंट देत प्रेक्षकांची विश्वासार्हता जपल्याचा फायदा त्यांना झाला आहे. दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये फिरकेनासे झाल्याचा फटका सिनेसृष्टीला बसत आहे. चित्रपटांच्या तिकिटांचे दरही तेच आहेत. चित्रपटांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया आल्यावरच प्रेक्षक गर्दी करत आहेत. नाट्यसृष्टीचा व्यवसाय अॅव्हरेज सुरू असला तरी प्रशांत दामले आणि भरत जाधव या आघाडीच्या कलाकारांसोबतच काही गाजलेल्या नाटकांना रसिक पसंती दर्शवत आहेत. या परिस्थितीत नाटकांच्या तिकिट दर वाढवण्याची शक्यता नाही. कोरोनानंतर रसिक पुन्हा नाटयगृहांमध्ये परतले हीच मराठी रंगभूमीसाठी दिलासादायक बाब आहे. महागाई वाढलेली असताना तिकिटांचे दरही वाढवले तर सध्या ५०-६० टक्के मिळणारे बुकींगही कमी होईल अशी भीती रंगभूमीला आहे. यासाठी होईल त्या बिझनेसमध्ये काही निर्माते नुकसान सोसूनही नाटक चालवत आहेत. सध्या नाटकांच्या तिकीटांचे दर २००, ३०० आणि ४०० रुपये असे आहेत. ५०० रुपयांच्या वर तिकिट गेल्यास निर्मात्यांना जीएसटी भरावा लागेल. जीएसटी प्रेक्षकांकडून घ्यायचा तर तिकीट आणखी महागेल. त्यामुळे तूर्तास नाटकांच्या तिकीटांचे दर वाढण्याची चिन्हे नाहीत. पूर्वी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन नाटके यायची, पण यंदा तसे काही चित्र दिसत नाही. यंदा नवीन नाटकांचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
असा आहे अंदाज...या वर्षी ओटीटीचा बिझनेस साडे चार ते पाच पटीने वाढून ४०००-४५०० कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. आज भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या ७६१ दशलक्ष असून, यंदा ओटीटी वापरणाऱ्यांची संख्या ६२ दशलक्षपर्यंत वाढेल असा अंदाज केपीएमजीतर्फे वर्तवण्यात आला आहे.
राहुल भंडारे (नाट्यनिर्माते)सध्या काही नाटकांची स्थिती चांगली आहे. इतर नाटके अॅव्हरेज बिझनेस करत आहेत. कोरोनानंतर जरी प्रेक्षक परतले असले तरी पूर्वीसारखा रिस्पॅान्स मिळत नाही. आजही मराठी रसिकांना जिवंत कला असलेले नाटक पहायचे आहे. त्यामुळेच ओटीटीच्या स्पर्धेतही नाटक टिकून आहे. १८२ वर्षांचा इतिहास लाभलेली मराठी रंगभूमी रसिकांच्या प्रेमामुळेच तग धरून आहे. कोरोनानंतर नाट्य व्यवसायावर ३५-४० टक्के परिणाम झाला आहे.
अक्षय बर्दापूरकर (संचालक - प्लॅनेट मराठी)मराठी ओटीटीलाही चांगला रिस्पॅान्स मिळतोय. 'मी पुन्हा येईन' या वेब सिरीजला चांगला प्रतिसाद मिळत असून, लवकरच 'सहेला रे' आणि 'तमाशा लाईव्ह'ही ओटीटीवर येतील. सुरुवातीपासून आतापर्यंत सबस्क्राईबर्सची संख्या दुप्पट झाली आहे. युझर्स आणि डाऊनलोडसही खूप वाढले आहेत. असे असले तरी दर वाढवणार नाही, पण जमले तर दर नक्कीच कमी करू. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा प्लॅटफॅार्म पोहोचू शकेल.
नरेंद्र फिरोदिया (संस्थापक - वनओटीटी)आमच्या ओटीटीचे काम अंतिम टप्प्यात असून, तयारी पूर्ण झाल्यावर मार्केटमध्ये उतरणार आहोत. चहूबाजूंनी काम पूर्ण झाल्यावर दिवाळीच्या आसपास लाँच करू. हे रसिकांसाठी मोफत असेल की पैसे भरावे लागतील यावर लवकरच निर्णय घेऊ. मराठीपासून सुरूवात झाल्यावर गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये कंटेंट पहायला मिळेल. सुभाष घईंच्या व्हिसलिंग वुड्ससोबत टायअप केले आहे. हा प्लॅटफॅार्म फॅमिली ऑडियन्ससाठी असेल. मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांच्यासोबत प्रत्येकी एकेक सिरीज करत आहोत.