ओवी नाटकाच्या टीमने अलिबागपर्यंत केला बोटीने प्रवास, शेअर केले धमाल मस्तीचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 10:32 AM
‘ओवी’ ही एकांकिका एका एकांकिका स्पर्धेत सादर झाली होती. या एकांकिकेला मिळालेल्या प्रतिसादानंतर ही एकांकिका आता व्यावसायिक रंगभूमीवर दोन ...
‘ओवी’ ही एकांकिका एका एकांकिका स्पर्धेत सादर झाली होती. या एकांकिकेला मिळालेल्या प्रतिसादानंतर ही एकांकिका आता व्यावसायिक रंगभूमीवर दोन अंकी नाटक म्हणून सादर झाली आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या अश्वमी थिएटर्सने याची निर्मिती केली आहे. गौरी इंगवले आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या नाटकात मुख्य भूमिका आहेत. साठ्ये महाविद्यालयाच्या सचिन, अनिकेत लिखित आणि अनिकेत पाटील दिग्दर्शित ‘ओवी’ या नाटकांचे गेल्या काही दिवसांत अनेक प्रयोग झाले असून प्रेक्षकांनी या नाटकाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या नाटकाचे दौरे केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभर होत आहेत. या नाटकाचा एक प्रयोग नुकताच अलिबागमध्ये झाला होता. त्या नाटकाच्या प्रयोगाची एक गंमत हेमांगी कवीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या प्रयोगासाठी अलिबागला जाताना या टीमने बसने न जाता बोटीने जाणे पसंत केले. हेमांगी कवीने नाटकाच्या संपूर्ण टीमला बोटीतून अलिबागला जाण्यासाठी पटवले. त्यामुळे हा प्रयोग म्हणजे या टीमसाठी एक छोटीशी ट्रीपच झाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. हेमांगीने तिच्या फेसबुकच्या अकाऊंटवर अलिबागला जाताना गेट वे ऑफ इंडियावर काढलेला एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोत हेमांगीचा एक वेगळाच आणि छान लूक आपल्याला पाहायला मिळत आहे. 'ओवी' हे नाटक लवकरच गुजराती रंगभूमीवर देखील दाखल होणार आहे. मूळ मराठी नाटकाचा लेखक-दिग्दर्शक अनिकेत पाटील हाच गुजराती नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रसिद्ध लेखक इम्तियाज पटेल 'ओवी'चे गुजराती भाषांतर करत आहेत. विशेष म्हणजे अनिकेतचे मराठी रंगभूमीवरील 'ओवी' हे पहिलंवहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि आता याच नाटकाच्या निमित्ताने तो आता गुजराती रंगभूमीवर देखील पदार्पण करतोय. एक अनोखा थरारक अनुभव देणाऱ्या 'ओवी' या मराठी नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग सध्या सुरू आहेत. सादरीकरणातल्या वैविध्यतेमुळे हे नाटक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मूळ एकांकिकेवरून त्याचं व्यावसायिक नाटक करण्यात आले आहे. Also Read : हेमांगी कवी म्हणतेय, कवी हूँ मैं