Join us  

"बाबा लगीन" म्हणणाऱ्या बाब्याची 'पछाडलेला' सिनेमात एन्ट्री कशी झाली? अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाला- "महेश कोठारेंनी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 10:59 AM

महेश कोठारेंना कुठे भेटला "बाबा लगीन" म्हणणारा बाब्या? अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाला...

'पछाडलेला' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. हॉरर कॉमेडी असलेला हा सिनेमा २००४ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील अनेक कॅरेक्टर लोकप्रिय झाली होती. 'डोळे बघ डोळे बघ', 'सूड दुर्गे सूड' म्हणणाऱ्या इनामदार भुसनळेंबरोबरच त्यांचा लेक बाब्याही हिट ठरला होता. बाब्याचं "बाबा लगीन...ढिनच्याक ढिनच्याक" हा डायल़ॉग तर प्रचंड व्हायरल झाला होता. पछाडलेला सिनेमात या बाब्याची भूमिका अभिनेता अमेय हुनासवाडकरने साकारली होती. पण, या वेड्या बाब्याची महेश कोठारेंच्या सिनेमात एन्ट्री कशी झाली? हे तुम्हाला माहितीये का? अमेयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा किस्सा सांगितला आहे. 

महेश कोठारे दिग्दर्शित 'पछाडलेला' सिनेमात तगडी स्टारकास्ट होती. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, श्रेयस तळपदे, भरत जाधव, अभिराम भडकमकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. बाब्याची भूमिका साकारणाऱ्या अमेयने नुकतीच इट्स मज्जाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने पछाडलेला सिनेमात त्याची एन्ट्री कशी झाली याबरोबरच कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. अमेय म्हणाला, "सुलोचना ताईंच्या पंच्याहत्तरीनिमित्त रंगशारदामध्ये कार्यक्रम होता. सुलोचना ताईंबरोबर मी स्टेजवर उभा होतो. तिथे महेश कोठारे आले आणि त्यांनी सुलोचना ताईंना शुभेच्छा दिल्या. तेव्हा ते म्हणाले की मी एक सिनेमा करतोय पण मला एक कॅरेक्टर मिळत नाहीये. सुलोचना ताईंनी तेव्हा माझ्याकडे बोट दाखवलं आणि त्या महेश कोठारेंना म्हणाल्या की हा चालतोय का बघ. महेश कोठारेंनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की उद्या माझ्या ऑफिसमध्ये ये". 

"मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे अभिराम भडकमकर, महेश कोठारे आणि त्यांची पूर्ण फॅमिली होती. त्यांना मी माझं आधीचं काम दाखवलं. त्यानंतर लूक टेस्ट झाली आणि मला तो सिनेमा मिळाला. कोल्हापूरला सिनेमाचं शूटिंग होतं. पहिलाच शॉट माझा होता. आणि भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, श्रेयस तळपदे असे सगळेच होते. पछाडलेला सिनेमानंतर माझं रस्त्यावर पाणीपुरी, भेळपुरी खाणं सगळं बंद झालं. लोक मला खरंच वेडा समजायचे. काही लोक ट्रीटमेंट सुरू आहे का, असं विचारायचे. त्यानंतर अनेक सिनेमा आणि जाहिरातींच्या मला ऑफरही मिळाल्या", असंदेखील अमेयने सांगितलं. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीसिनेमा