Join us  

'रंग बदलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा..'; मराठी अभिनेत्रीला पुण्यात शूटींग करताना आला विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 3:13 PM

'पछाडलेला', 'फुलराणी' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने एका चित्रपटाच्या शूटींगवेळी आलेला विचित्र अनुभव शेअर केलाय (ashvini kulkarni)

'पछाडलेला' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. भुसनळ्या, बाबा लगीन, मालक - मालक हे सिनेमातले संवाद चांगलेच लोकप्रिय ठरले. या सिनेमात श्रेयस तळपदे जिच्याशी शेवटी लग्न करतो ती अभिनेत्री म्हणजे अश्विनी कुलकर्णी. अश्विनी यांना आपण गेल्या अनेक वर्षांपासून विविध माध्यमांत अभिनय करताना पाहतोय. अश्विनी यांनी सोशल मीडियावर कोणाचंही नाव न घेता त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातून आलेला एक विचित्र अनुभव शेअर केलाय. 

निर्मात्यांमध्ये भांडणं. चित्रपट अपूर्ण राहणार होता तोच...

अश्विनीने सोशल मीडियावर तिला आलेला अनुभव शेअर केलाय. अश्विनी लिहिते, माननीय... एखाद्या कलाकृतीचा आपण मुख्य भाग असणं.. आणि ती प्रदर्शित होणं ही प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील खूप सुखावणारी गोष्ट असतें.. आणि असं सुख देवाने मला भरभरुन दिलं आहे.. आणि देत राहावं ही प्रार्थना. पण अशाच एका कलाकृतीच्या निमित्ताने आलेला एक विचित्र अनुभव शेअर करावासा वाटतो.. मुद्दाम कलाकृतीचे नाव घेत नाही, कारण उगाच कोणाचे नाव काहीही कारणाने प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आपल्या मुळे होऊ नये हा प्रामाणिक हेतू.. दोन वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एक चित्रपट शूट केला.. दोन निर्मात्या मधली भांडणे, निर्माता दिग्दर्शक यांच्यात वाद, इत्यादी इत्यादी होत तो चित्रपट अपूर्ण राहिला होता. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजेभोसले यांच्या मध्यस्थीने आणि पाठिंब्याने तो पूर्ण झाला.. मेघराज भैय्या हे खरंच वडील बंधू प्रमाणे असल्याने, त्यांच्या शब्दाला मान देऊन मी (आणि बहुदा इतर कलाकारांनी ही) निर्मात्याला सहकार्य करून चित्रपट पूर्ण केला."

चित्रपट प्रदर्शनाची तारीख कळवलं नाहीअश्विनी पुढे लिहिते, "सदर निर्माता, आणि बदललेले, मूळ असे दोन्ही (का तिन्ही)दिग्दर्शक यांना या चित्रपटाच्या कोणत्याही promotional activities इतकंच काय पण प्रीमियर ला देखील त्यांच्या मुख्य अभिनेत्रीला बोलावण्याची साधी औपचारिकता दाखवता आली नाही.. इतकंच काय पण चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख बदलली, हे सुद्धा कळवाव असं वाटलं नाही.. माझी हरकत काहीच नाही, पण या सगळ्या मागे कारण काय असावं हा प्रश्न अनुत्तरित आहे"

म्हणून हा पोस्ट प्रपंच..अश्विनी शेवटी लिहिते, "अडकलेला चित्रपट पुर्ण करून, वेळेत त्याचे डबिंग करून, माझ्याकडून अपेक्षित असलेले सहकार्य करून ही जेव्हा आपण वगळले जातो, तेव्हा थोडं वाईट वाटलं इतकंच. माझ्यासारख्या अनेक कलाकारांनी हे अनुभवलं असेलच.. तेव्हां या "वाटण्याची" थोडी देवाण घेवाण करावी या साठी हा पोस्ट प्रपंच. तेव्हा आता या गोष्टी कडे दुर्लक्ष करून मी माझी नवीन मालिका, आणि आगामी चित्रपट याच्या कामात स्वतःला व्यस्त करून घेतलं आहे.. शेवटी रंग बदलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्या पेक्षा..चेहेऱ्याला लागलेल्या रंगाशी माझं इमान राखून ठेवण्यात मी आग्रही आहे.. ही रंगदेवता माझ्यावर सतत प्रसन्न रहो.. आणि रसिकांचे आशिर्वाद पाठीशी राहोत हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना. बाकी.. चलता है."

टॅग्स :मराठीमराठी अभिनेतामराठी चित्रपटश्रेयस तळपदे