लग्न हा भारतीय संस्कृतीत एक पवित्र सोहळा मानला जातो. ते केवळ दोन जीवांचं मिलन नसतं, तर त्यांच्या अवतीभवती असलेल्या नातेवाईकांच्या ऋणानुबंधांचंही मिलन असतं. मात्र लग्न सोहळा म्हटलं की मानापमान, रुसवे फुगवेही आलेच. लग्नात कोण, केव्हा आणि कशावरुन गोंधळ घालेल याचा काहीही नेम नसतो. त्यामुळे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमी जीवांच्या मनात त्यांचे लग्न लागेपर्यंत सतत धाकधूक लागलेली असते. अशीच काहीशी धाकधूक आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता पॅडी कांबळेला लागल्याने तो ‘लगीनघाई’ करताना दिसतोय. त्याला त्याच्या नव्या लग्नाची जाम चिंता आहे. नातेवाईकांच्या गोंधळाला आणि त्यांच्या रुसव्या फुगव्यांना तो पुरता घाबरून गेलाय. त्याला त्याच्या लग्नाची फार चिंता वाटू लागली आहे. या भीतीपोटी त्याने थेट पुढचं पाऊल उचलत लोकप्रिय अभिनेता व समाजसेवक मकरंद अनासपुरे आणि प्रख्यात विनोदी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या मदतीने ‘वऱ्हाडी वाजंत्री’ घेऊन येत्या 11 नोव्हेंबरला बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. 11 नोव्हेंबर हा दिवस कधी उजाडतोय आणि चिं. सौ. का. परी सोबत त्याचं लग्न कधी लागतंय असं त्याला झालंय.
‘वऱ्हाडी वाजंत्र्यां’च्या मानधनासह या लग्नाचा सर्व आर्थिक बोजा स्वराज फिल्म प्रॉडक्शनतर्फे कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांसह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी स्व:खुशीने उचलला आहे.
आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांना पोट धरून हसवणाऱ्या विजय पाटकर यांनी त्यांच्या नव्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’या चित्रपटातही रसिकप्रेक्षकांना पोटधरून हसविण्याचं काम केलं आहे. विजय पाटकरांच्या या चित्रपटात पॅडीच्या अभिनयानं सजलेला युवराज पहायला मिळणार आहे. या युवराजचेच हे लग्न असून ‘परी’ म्हणजेच आपल्या सर्वांना हसवणारी हेमांगी कवी सोबत त्याची केमिस्ट्री जमली आहे. दोघांचं विनोदी गाणं सध्या विविध चॅनेल्सवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री’या चित्रपटात मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, रिमा लागू, पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.