राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपट आशयघनतेसाठी ओळखले जातात. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित, प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची चर्चा केवळ मराठी भाषिकांमध्ये किंवा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून मराठीसह इतर प्रादेशिक चित्रपटाकडे लक्ष ठेउन असलेल्या विदेशातील सिनेरसिकांमध्येही असल्याचे बघायला मिळते, यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे.
पाकिस्तानस्थित फारुख मुगल या यूट्यूबरने आपल्या ‘अॅक्शन रीअॅक्शन’ या यूट्यूब चॅनल वर ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या ट्रेलर बद्दलचा रिअॅक्शन व्हिडिओ शेअर केला आहे. फारुख मुगलने आपल्या व्हिडिओमध्ये चित्रपटातील कलाकरांचे आणि कवितांचे तोंड भरून कौतुक केले असून चित्रपटातील संगीत, अभिनय आणि वैभव जोशी यांच्या घराची कथा सांगणाऱ्या कविता आवडल्याचेही नमूद केले आहे. तसेच फारुखने सर्वांना 'होम स्वीट होम' चित्रपट आवर्जून बघण्याचे आवाहन केले आहे.
सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी 'होम स्वीट होम' मधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर चित्रपटाचे निर्माते तर आकाश पेंढारकर, विनोद सातव प्रस्तुतकर्ते आहेत. घर आणि नात्यांच्या नात्यांच्या रिडेव्हल्पमेंटवर अतिशय वेगळ्या अंदाजात ‘होम स्वीट होम’ भाष्य करतो.
सुमित राघवन आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याचा अमीट ठसा उमटवला आहे. मात्र आज पर्यंत त्यांनी कधीही एकत्रित काम केले नव्हते. पण फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.