पल्लवी सुभाषने आजवर अनेक मराठी, हिंदी मालिका, मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीतच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देखील तिने तिचा ठसा उमटवला आहे. तेलगू, तामीळ, मल्याळम, कन्नड अशा विविध भाषेच्या मालिकांमध्ये ती काम करते. एवढेच नव्हे तर तिने श्रीलंकेच्या मालिकेत देखील काम केले आहे.
तुम्हारी दिशा, करम अपना अपना, बसेरा, महाभारत, चक्रवर्ती अशोक सम्राट यांसारख्या मालिकांमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत. पल्लवी सुभाषने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही नाटकांमध्ये काम केले आहे. पण चित्रपट, मालिकांमध्ये व्यग्र असल्यामुळे ती काहीशी रंगभूमीपासून दूर झाली होती. पण आता अनेक वर्षांनंतर ती नाटकात झळकणार आहे. खळी या नाटकात ती मुख्य भूमिकेत असून या नाटकाची निर्मिती नाट्यमंदार आणि विप्रा किएशन्स मिळून करणार आहेत. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक शिरिष लाटकर हे आहेत.
खळी या नाटकात पल्लवीसोबतच संदेश जाधव आणि नेहा अष्टपुत्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नाटकाच्या तालमी सध्या जोरात सुरू असून या नाटकाचा पहिला प्रयोग 15 डिसेंबरला मुंबईच्या दिनानाथ नाट्यगृहात होणार आहे. अनेक वर्षांनंतर रंगभूमीवर काम करण्यास पल्लवी खूप उत्सुक आहे. ती सांगते, मला या नाटकाची कथा प्रचंड आवडल्याने या नाटकाद्वारे मी रंगमंचावर परतण्याचे ठरवले. या कथेच्या मी प्रेमात पडले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या नाटकात मी उपासना ही व्यक्तिरेखा साकारत असून या भूमिकेत आणि माझ्यात खूपच सार्धम्य आहे. उपासना माझ्यासारखीच असल्याने ही भूमिका साकारायला मला खूप मजा येत आहे.
खळी या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे करणार असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. या नाटकासाठी एक खास गाणे देखील बनवण्यात आले असून हे गाणे बीना सातोस्कर यांनी लिहिले आहे तर केतन पटवर्धन यांनी या गीताला संगीत दिले आहे. स्वरांगी मराठे आणि केतन पटवर्धन यांनी हे गीत गायले असून हे गीत रसिकांना नक्कीच आवडेल अशी या नाटकाच्या टीमला खात्री आहे.