आषाढी एकादशी आली की सर्वांना 'पंढरीची वारी' या सिनेमाची हटकून आठवण येते. इतकी वर्ष झाली तरीही आजही कोणत्या ना कोणत्या टीव्ही चॅनलवर हा सिनेमा हमखास टेलिकास्ट होतो. प्रेक्षकही आवर्जुन हा सिनेमा पाहतात. या सिनेमाचं कथानक आणि सिनेमातील कलाकारांचा अभिनय अशा अनेक गोष्टी अजरामर झाल्या. याच सिनेमात विठोबाच्या रुपात बालकलाकार बकुल कवठेकरने सर्वांचं प्रेम मिळवलं. पण बकुलचं पुढे काय झालं? याची भावुक कहाणी वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी.
पंढरीची वारी सिनेमा बकुलने गाजवला
'पंढरीची वारी' सिनेमात छोट्या विठोबाची भूमिका बकुल कवठेकर या बालकलाकाराने साकारली. बकुलने साकारलेली विठोबाची भूमिका महाराष्ट्रभर प्रचंड गाजली. एकही डायलॉग न बोलता केवळ हावभावांनी बकुलने संपूर्ण सिनेमात स्वतःची छाप पाडली. बकुल हा सिनेमाचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा मुलगा होता. पुढे बकुलने मोठा झाल्यावर त्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. पण बकुलचं अचानक निधन झालं.
'पंढरीची वारी' सिनेमा गाजवून बकुल नंतर कोणत्याही सिनेमात दिसला नाही. बकुलने पुण्यात भारती विद्यापीठात फाईन आर्ट्सचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला. परंतु २००२ सालीच शिक्षण घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने बकुलचं निधन झालं.
बकुलने जगाचा निरोप घेतला ही बातमी सर्वांना चटका लावून गेली. बकुलचा भाऊ समीर कवठेकर आज मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. समीरने भावाला आदरांजली म्हणून त्याच्या नावाने प्रॉडक्शन संस्था सुरु केलीय. 'बकुल फिल्म्स' असं या संस्थेचं नाव आहे. समीर यांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी, 'स्वराज्यजननी जिजामाता', 'राजा शिवछत्रपती' अशा गाजलेल्या मालिकांसाठी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.