सध्या मराठी सिनेमांमध्ये एकापेक्षा एक नवीन विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या 'फुलवंती', 'धर्मवीर २' या सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. अशातच मराठी मनोरंजन विश्वात आणखी एक हटके विषयाची इरसाल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'पाणीपुरी'. ‘जावई’ म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतात. जावयाला काय हवं? काय नको? त्याला काही कमी पडायला नको यासाठी सासू-सासऱ्यांची कायम धडपड सुरू असते. अशीच एका घरातील सासू आणि जावई यांच्यातील धमाल जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
पाणीपुरी चित्रपटाची कथा
‘पाणीपुरी’ चित्रपटात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी चिवट सासू रंगवली आहे. तिचा आणि जावयाचा कलगीतुरा सतत सुरु असतो. सासू आणि जावई यांच्या जुगलबंदीत काय होतं? याची धमाल गोष्ट ‘पाणीपुरी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. धमाल कथानक, उत्तम स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. ‘पाणीपुरी’ या आगामी चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे जावयाच्या भूमिकेत तर त्याच्या खाष्ट सासूच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा सुभेदार आपल्याला पहायला मिळणार आहेत.
या तारखेला रिलीज होणार पाणीपुरी
एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.