Join us

"घटस्फोट म्हणजे काडीमोड नव्हे तर.."; तीन जोडप्यांची चटकदार गोष्ट! 'पाणीपुरी'चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:45 PM

आगामी मराठी सिनेमा 'पाणीपुरी'ची उत्सुकता वाढली आहे (panipuri)

सध्या मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे.  या सिनेमाचं नाव 'पाणीपुरी'. नावाप्रमाणेच हा सिनेमा चटकदार असणार यात शंका नाही. या सिनेमाच्या पोस्टर आणि घोषणेपासूनच सर्वांनाच या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. अशातच 'पाणीपुरी' सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर काल लॉंच करण्यात आला. कलाकारांच्या विशेष उपस्थितीत हा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

'पाणीपुरी'च्या टीझरमध्ये काय?

'पाणीपुरी' सिनेमाचा अवघ्या काही मिनिटांच्या टीझरमध्ये सिनेमाच्या रंजक गोष्टीची झलक बघायला मिळते. 'पाणीपुरी'च्या टीझरमध्ये तीन जोडप्यांची कथा दिसते. काही कारणास्तव या जोडप्यांच्या सुखी संसाराला विरझण लागतं. आणि पुढे गोष्टी घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचतात. पुढे या तिघांच्या घटस्फोटाची केस वकीलाच्या भूमिकेत असलेले मकरंद देशपांडे सोडवताना दिसतात. हसवता हसवता नात्यांची जाणीव करुन देणारा हा टीझर शेवटी आपल्याला भावुक करुन सोडतो. 

'पाणीपुरी' कधी रिलीज होणार?

एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. या सिनेमात विशाखा सुभेदार, सायली संजीव, शिवाली परब, कैलास वाघमारे, हृषिकेश जोशी आणि मकरंद देशपांडे या कलाकारांची प्रमुुख भूमिका आहे. ही चटकदार ‘पाणीपुरी’ थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत यात शंका नाही.

टॅग्स :मराठीमराठी चित्रपट