सर्वसामान्यांसह तरुणाईला नाट्यगृहाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरलेलं ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक रसिकांचं तुफान मनोरंजन करत आहे.नुकतीच या नाटकात तनुची भूमिका साकारणारी अभिनेत्री सखी गोखलेने या नाटकातून एक्झिट घेतली. सखी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना होणार असल्यामुळे तिने या नाटकातून एक्झिट घेतली. नाटकातून एक्झिट घेत असलो तरी हे नाटक नावाप्रमाणे ‘अमर’ राहणार असं सखीने म्हटले होते. सखी या नाटकातून बाहेर पडत असताना तिची जागा कोण घेणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर यावरून पडदा उठला आणि सखीच्या जागी पर्ण पेठे या अभिनेत्रीच्या नावाचा शिक्का मोर्तब झाला. पर्ण पेठेने सोशल मीडियाद्वारे ही गुड न्युज शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाटकाचे पोस्टर शेअर करत म्हटले आहे की, ''प्रत्येक नाटकाचा प्रवास हा मला अंतरबाह्य बदलवणारा ठरला आहे. हा नवा प्रवास सुध्दा ह्याला अपवाद नसेल ! एकाचवेळी पोटात गोळा आणणारं, नवीन जबाबदारी देणारं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड उत्साह देणारं माझं नवं नाटक : अमर फोटो स्टुडिओ !! मला ह्या स्टुडिओत सामावून घेतल्याबद्दल माझ्या प्रिय आणि हरहुन्नरी मित्र मैत्रिणीचे मनापासून आभार.'' अमेय वाघ, सुव्रत जोशी, पर्ण पेठे, सिद्धेश पूरकर आणि पूजा ठोंबरे अशी तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करणार आहे.
आपल्या यशाचे श्रेय सखी कायमच आपल्या पालकांना विशेषतः आपली आई शुभांगी गोखले यांना देते. तिने अनेकदा आपल्या आईचं आपल्या जीवनात किती मोलाचं स्थान आहे हे जाहीररित्या सांगितलं आहे.याचीच प्रचिती पुन्हा एकदा सोशल मीडियावर आली आहे.एका नाट्य रसिकाकडे साखर खाल्लेला माणूस या नाटकाची दोन तिकीटे होती. या नाटकात प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांची प्रमुख भूमिका आहे. मात्र काही कामामुळे या नाट्य रसिकाला या नाटकाला जाणं शक्य नसल्याने तसं ट्विट त्याने केले. प्रशांत दामले आणि सखी गोखलेच्या आईची भूमिका असणा-या नाटकाची दोन तिकीटे आहेत. कुणाला हवी असल्यास संपर्क करणे असं ट्विट त्याने केले. याच ट्विटला सखीने उत्तर दिले आहे. या ट्विटमधील सखीची आई यावर तिने या नाट्य रसिकाला उत्तर दिले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव शुभांगी गोखले आणि मी त्यांची मुलगी. कुणाला तिकीटं हवं असल्यास घ्या असं उत्तर तिने ट्विट करुन दिले होते.