Join us

'पोपट'ची पोपटपंची अर्थपूर्ण - संदीप पाठक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2016 8:57 PM

आपल्या उत्तम अभिनयामुळे संदीप पाठकची खास ओळख आहे. १ एप्रिलला प्रदर्शित होत असलेल्या फ्लाईंग गॉड फिल्म्स, विश्वास मीडिया अँड ...

आपल्या उत्तम अभिनयामुळे संदीप पाठकची खास ओळख आहे. १ एप्रिलला प्रदर्शित होत असलेल्या फ्लाईंग गॉड फिल्म्स, विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट निर्मित आणि बिपिन शहा मोशन पिक्चर्स प्रस्तुत रंगा पतंगा या चित्रपटात संदीपनं पोपट ही धमाल व्यक्तिरेखा साकारली आहे. या निमित्तानं संदीपशी केलेली बातचित...रंगा पतंगा चित्रपटाविषयी काय सांगशील ?- आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका माझ्या वाट्याला आल्या. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. इन्व्हेस्टमेंट, एक हजाराची नोट यांच्यानंतर रंगा पतंगा माझ्यासाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. यातील पोपट ही व्यक्तिरेखा नक्कीच आव्हानात्मक होती. चित्रपटाचा विषय खूप गंभीर आहे. त्यात विशिष्ट परिस्थितीवर भाष्य आहे. एका शेतकऱ्याचे बैल हरवले या एका ओळीच्या गोष्टीपलिकडे जाऊन ही कथा मांडली आहे. तुझ्या पोपट या भूमिकेविषयी काय वाटतं?- यातील पोपट ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. हा पोपट चतुर आहे. ग्रामीण भागातल्या चतुर आणि उचापती माणसांचं तो प्रतिनिधित्त्व करतो. त्याची सामाजिक, राजकीय समज फार महत्त्वाची आहे. जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन तो मैत्रीचं नातं निभावतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वातला प्रामाणिकपणा आजच्या समाजासाठी महत्त्वाची आहे. हा प्रामाणिकपणा समजून घेऊनच ही व्यक्तिरेखा करणं महत्त्वाचं होतं. आतापर्यंतच्या माझ्या भूमिकांत पोपट नक्कीच वेगळा आहे. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना 'रंगा पतंगा' प्रदर्शित होत आहे. त्या दृष्टीनं हा चित्रपट कसा महत्त्वाचा वाटतो ?- रंगा पतंगा नक्कीच वेगळा चित्रपट आहे. त्यात दुष्काळ, शेतकरी, राजकारण, समाजकारण, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मात्र, माणूस म्हणून विचार करताना हा चित्रपट 'रिलेव्हंट' राहू नये असं वाटतं. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये, राजकीय अनास्थेवर बोलत राहण्यापेक्षा स्वतः बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. मकरंद अनासपुरे यांच्यासारखा उत्तम अभिनेता समोर असताना 'पोपट' साकारणं आव्हान नाही वाटलं ?- मला कॅरॅक्टर उभं करायला आवडतं. लेखकानं कथा, पटकथेत जे पात्र लिहिलंय ते स्वतःचे शंभर टक्के देऊन साकारणं महत्त्वाचं वाटतं. लहानपणापासून मकरंद अनासपूरे यांना पहात आलोय. उत्तम विनोद त्यांच्याकडूनच शिकलो. ते समोर असताना दडपण येण्याची शक्यता होती. मात्र, मला माझं पात्र उभं करायचं होतं. या चित्रपटातला विनोद ब्लॅक ह्युमर, उपरोध, विसंगती प्रकारातला आहे. हसता हसता विचार करायला लावणारा आहे. म्हणून ही भूमिका आव्हानात्मक होती. विनोद करणं हेच खूप गंभीर काम असतं. मकरंद अनासपूरे स्वतः खूप तयारी करून आले होते. त्यांनी मदत केली नसती, तर ही भूमिका चांगल्या रितीनं उभी राहिली नसती. त्यांच्या शांत राहण्यानं पोपटची पोपटपंची अर्थपूर्ण झाली. मकरंद अनासपूरे आणि तू दोघंही मराठवाड्याचे. चित्रपटात वैदर्भीय बोलीचा वापर केला आहे. ही बोली अचूकपणे बोलण्यासाठी काही वेगळा प्रयत्न करावा लागला ?- वैदर्भीय बोलीचा लहेजा वेगळा आहे, बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र, समस्या त्याच आहेत. आम्ही दोघंही ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागातले असल्यानं या समस्यांची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे या भूमिकांसाठी वेगळी तयारी करावी लागली नाही. त्याशिवाय लहेजा परिचयाचा होता. आमचे काही नातेवाईक विदर्भातले असल्यानं आणि आमचंही येणंजाणं असल्यानं आम्हाला ती बोली माहीत होती. परिपूर्ण वैदर्भीय बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.रंगा पतंगा प्रेक्षकांनी का बघावा ?सद्य परिस्थितीवर प्रामाणिक भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. हसणं, रडणं, चुकचुकणं या सगळ्या भावना प्रेक्षकांना नक्की अनुभवायला मिळतील. चिमटे काढत, कोपरखळी मारत वस्तुस्थिती सांगितली आहे. वेगळ्या दृष्टिकोनातून परिपूर्ण मनोरंजन केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्येच जाऊन पहावा.