'पार्टी' म्हंटली कि मित्र हे आलेच ! मित्रांच्या या धम्माल मास्तीमुळे रंगात आलेल्या 'पार्टी' ची मज्जा काही औरच असते. वास्तविक आयुष्यातील याच मित्रांवर आधारित, सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' सिनेमा प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या 'पार्टी'त अवधूत गुप्ते, प्रशांत लोके, अमितराज आणि गुरु ठाकूर या जुन्या मित्रांनीदेखील त्यांना मोलाचा हातभार लावला आहे. बोरीवली पूर्व भागात राहणाऱ्या या साऱ्या मित्रांनी मराठी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या सर्व दिग्गजांचा 'पार्टी' हा गेटटुगेदर सिनेमा आहे. या सिनेमाविषयी बोलताना सचिन दरेकर सांगतात कि, 'पार्टी' या सिनेमाचे कथानक कट्ट्यावर चहा पित असताना सुचले होते.
'पार्टी' सिनेमाचा सहाय्यक लेखक प्रशांत लोकेसोबत कट्ट्यावर बोलत बसलो असताना, गप्पांच्या ओघात जुन्या मित्रांचे किस्से निघाले. त्यावेळी केलेल्या मौजमज्जा आणि बॅचलर पार्ट्या डोळ्यासमोर उभ्या झाल्या. या सर्व आठवणी सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगण्याचा मी प्रयत्न केला आहे'. खऱ्या आयुष्यात मित्रांबरोबर घडलेल्या काही घटनांचा संदर्भदेखील या सिनेमात मांडला असल्याचे ते पुढे सांगतात. मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमात अवधूत गुप्ते, अमित राज आणि गुरु ठाकूर या तिघांचा सांगीतिक हातभार लाभला आहे. प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी 'पार्टी' सिनेमातील सर्व गाणी लिहिली असून, संगीतदिग्दर्शक अमितराजने त्यांना संगीत दिले आहे. शिवाय, सध्या गाजत असलेल्या 'भावड्या' या गाण्यामधून अवधूत गुप्तेचा एक वेगळाच आवाज लोकांपर्यत पोहोचत आहे.
येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची प्रस्तुती सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांनी केली असून, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या मराठीच्या प्रसिद्ध युवा कलाकारांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे.