Join us

‘पार्टी’तून होणार जुन्या यारी-दोस्तीची सफर !-दिग्दर्शक सचिन दरेकर

By अबोली कुलकर्णी | Published: September 04, 2018 6:47 PM

काळाच्या ओघात खरी दोस्ती, यारी, मैत्री ही मागे पडते. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर तुम्हाला अशा जिवलग मैत्रीची आठवण जरूर होते. सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

मैत्री म्हणजे मानवी आयुष्यातील सर्वांत सुंदर नातं. प्रत्येकाच्या आयुष्यात या नात्याचे स्थान उच्चस्थानावरच असते. काळाच्या ओघात खरी दोस्ती, यारी, मैत्री ही मागे पडते. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर तुम्हाला अशा जिवलग मैत्रीची आठवण जरूर होते. सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारे दिग्दर्शक सचिन दरेकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

‘पार्टी’ हा चित्रपट  ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची प्रस्तुती सुपरहिट फिल्म ‘बकेट लिस्ट’चे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांनी केली असून,  नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात मंजिरी बरोबरच सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी मराठीच्या प्रसिद्ध युवा कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

 * ‘पार्टी’ या चित्रपटातून तुम्ही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहात. किती उत्सुक आहात या चित्रपटाविषयी? - होय, नक्कीच. पार्टी या चित्रपटाबद्दल मी खूप उत्सुक आहे. पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवतोय, त्यामुळे नवा उत्साह आहे. आता माझा प्रयत्न प्रेक्षकांना कसा वाटतो, यावर आधारित आहे. त्यांचे प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे. 

 * ‘पार्टी’ या चित्रपटाचे कथानक आणि एकंदरितच टीमबद्दल काय सांगाल?- प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री या नात्याला विशेष स्थान असते. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्येक प्रेक्षकांना त्यांच्या जुन्या मैत्री अन् दोस्तीची आठवण होईल. ही चार मित्रांची कथा आहे. त्यांच्या आयुष्यातील घटना-घडामोडी त्यांचे मित्रत्वाचे नाते कसे समृद्ध करते, हे या चित्रपटाच्या निमित्ताने बघावयास मिळणार आहे. टीमच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळी नवी मंडळी यात असणार आहेत. सर्व फ्रेश जोड्या या टीममध्ये आहेत. 

 * तुम्ही आत्तापर्यंत स्क्रिन रायटर आणि डायलॉग रायटर म्हणून काम पाहिले आहे. एखादा प्रोजेक्ट स्विकारताना तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेता?- मी फक्त एवढंच बघतो की, मला मिळणारं काम हे मला आनंद देणारं हवं. ते काम करताना मला कधीही कंटाळा येता कामा नये. त्यामुळे मी या चित्रपटाच्या निमित्तानं तोच फ्रेशपणा अनुभवतो आहे. हा चित्रपट करत असताना मला प्रचंड मजा आली.

 * दिग्दर्शकाची जबाबदारी किती महत्त्वाची वाटते? सध्याच्या हिंदी-मराठी दिग्दर्शकांबाबतचे मत काय?- चित्रपट प्रदर्शित होऊन त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेपर्यंत लेखक, दिग्दर्शक यांची महत्त्वाची जबाबदारी असते. दिग्दर्शकाला सगळयांच गोष्टींचे भान असणे अपेक्षित असते. आता हिंदी किंवा मराठी इंडस्ट्रीत चांगल्या विषयांवर चित्रपट येऊ पाहत आहेत. सध्याचे दिग्दर्शकही वेगवेगळया थीमवर आधारित चित्रपट बनवत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाही विचार करायला भान पाडणारे कथानक चित्रपटाच्या रूपाने समोर येत आहे.

 * तुम्ही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहात. सध्या ट्रोलिंगचे वाढते प्रमाण पाहता सेलिब्रिटींनी कोणती काळजी घ्यावी, असे वाटते?- होय, मी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहात. नेटिझन्सकडून होणाऱ्या  ट्रोलिंगचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, यात प्रत्येकाचा वैयक्तिक दृष्टीकोन पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचं आपलं आयुष्य आहे, ते आपापल्या पद्धतीनं जगण्याचा नक्कीच प्रयत्न व्हायला हवा. सेलिब्रिटींनीही पोस्ट करत असताना त्याचा सारासार विचार करायला हवा.

टॅग्स :मराठीसुव्रत जोशी