मराठी चित्रपट हा त्याच्या वेगळ्या आशय-विषयांमुळे ओळखला जातो. स्वतच्या जिद्दीनं स्थान मिळवणारे, यश मिळवणारे अनेकजण असतात. त्यांची धडाडी इतरांना प्रेरणादायी असते. अशाच एका जिद्दीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आगामी ‘पाटील’ या मराठी चित्रपटातून केला जाणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात संपन्न झाला. श्री. श्रीकांत भारतीय, ओमप्रकाश शेट्ये (मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी) ‘परिंदा’, ‘वास्तव’ यांसारख्या हिंदी चित्रपटांचे लेखक इम्तियाज हुसेन, आमदार हेमंत पाटील, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील या सारखे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच चित्रपटातील कलाकार याप्रसंगी उपस्थित होते. येत्या २६ ऑक्टोबरला ‘पाटील’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नांचे कौतुक करतानाच अभिनेता सचिन पिळगांवकर, लेखक इम्तियाज हुसेन व अन्य मान्यवरांनी यावेळी या चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपली मूल्यं जपण्याचा प्रयत्न करत जगण्याचा एक वेगळा संघर्ष मांडणारा ‘पाटील’ हा चित्रपट प्रत्येकाला खूप काही शिकवणारा असेल असा विश्वास दिग्दर्शकांनी याप्रसंगी व्यक्त केला.
स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि, सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत.
या चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, संतुकराव हंबर्डे, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी कांबळे, सौरभ तांडेल, सुधीर पाटील, सोमनाथ दिंगबर, रामराव वडकुते, संतोष बांगर, जेनील शहा, विजय जैन, हाजी पटेल, गणेश बीडकर, सहनिर्माते आहेत. विवेक सिंग, चिराग शहा कार्यकारी निर्माते आहेत. अमेय विनोद खोपकर, ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडीओज’ यांचे सहकार्यसुद्धा चित्रपटाला लाभले आहे.
चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्स ची जबाबदारी प्रशांत मेहता तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी सुरेश पिल्ले यांनी सांभाळली आहे. २६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.