ऐतिहासिक सिनेमा पावनखिंड(Pavankhind)मध्ये अजय पुरकर यांनी महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली होती. प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो. अजय पुरकर यांनी फक्त बाजीप्रभू साकारले नाहीत तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याच प्रेमापोटी अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर ते स्वप्न पूर्ण झालं आहे. आता त्यांनी या घरात गृहप्रवेश केला आहे.
अजय पुरकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर अभिनेत्यावर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. आता अजय पूरकर यांनी १९ जून ला नवीन गृहप्रवेश ....त्याच दिवशी पावनखिंड चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर....योग जुळून आलाय....उत्तम मुहूर्तावर दोन्ही गोष्टी घडल्या....महादेवाचा आशीर्वाद 🙏🙏असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. चाहत्यांनी अभिनेत्याचे अभिनंदन केलं आहे.
अजय पुरकर बाजीप्रभूंची भूमिका ते अक्षरश: जगले. या भूमिकेसाठी त्यांनी दोन वर्ष अपार मेहनत घेतली आणि त्यांची ती मेहनत पडद्यावर दिसली. बाजीप्रभूंची व्यक्तिरेखा त्यांनी इतकी लिलया जिवंत केली की त्याला तोड नाही.
अजय यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या ‘कोड मंत्र’ या नाटकानं एकाच वर्षात तब्बल 24 पुरस्कार मिळवले होते. अजय यांनी नाटकांसोबतच मालिका आणि चित्रपट क्षेत्रात देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.