खास मुलाखत! जिरेटोप चढवल्यानंतर सेटवर ‘ही’ गोष्ट चिन्मय मांडलेकर चुकूनही करत नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 01:56 PM2022-02-18T13:56:10+5:302022-02-18T15:14:11+5:30

Pawankhind Movie : ‘चित्रपट संपल्यानंतर एकही असा डोळा नसेल जो कोरडा आहे...’; ‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या निमित्तानंचिन्मय मांडलेकरची खास मुलाखत

Pawankhind Marathi Movie Exclusive Interview with Chinmay Mandlekar | खास मुलाखत! जिरेटोप चढवल्यानंतर सेटवर ‘ही’ गोष्ट चिन्मय मांडलेकर चुकूनही करत नाही...!

खास मुलाखत! जिरेटोप चढवल्यानंतर सेटवर ‘ही’ गोष्ट चिन्मय मांडलेकर चुकूनही करत नाही...!

googlenewsNext

आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा..., असं अभिमानानं सांगणारा ‘पावनखिंड’ (Pawankhind ) हा ऐतिहासिक सिनेमा आज प्रदर्शित झालाये. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास, बाजीप्रभूंच्या शौर्याची यशोगाथा पावनखिंड या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar ) याने यानिमित्ताने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली.

पावनखिंडमध्ये महाराज साकारणं आव्हानं होतं...
फर्जंद, फत्तेशिकस्त यानंतर  दिग्पालनं (लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर) एक ठरवलं होतं. ते म्हणजे, शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ माझ्या प्रत्येक सिनेमात सेम असतील. त्यामुळे मी आणि मृणाल ताई पावनखिंड या चित्रपटात आहोत. पण एक गोष्ट अशी आहे की, प्रत्येक चित्रपटात व्यक्तिरेखा शिवरायांची असली तरी त्याचा एक वेगळा पैलू आहे. पावनखिंड ही एक अतिशय इमोशनल फिल्म आहे. ही एक बलिदानगाथा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अतिशय सुंदर संवेदनशील प्रवास या चित्रपटात आपल्याला बघायला मिळेल. ही भूमिका साकारणं आव्हान होतं. महाराजांच्या प्रतिष्ठेला जराही नख न लावता हा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे मोठं आव्हान होतं, असं चिन्मय म्हणाला.

प्रत्येकवेळी शिवाजी महाराज नव्यानं कळत गेले...

फर्जंदच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला शाळेत शिकवलं गेलं होतं, तेवढंच माहित होतं. किंवा ऐतिहासिक कादंबऱ्या ज्या वाचल्या होत्या, तेवढंच मी जाणून होतो. पण प्रत्येक चित्रपटासोबत  शिवाजी महाराज मला नव्यानं कळतं गेले. त्यांचे अनेक पैलू माझ्यासमोर आलेत. फर्जंदमध्ये राज्याभिषेकाचा सीन आहे. तेव्हा महाराज राजव्यवहार कोश तयार करायला सांगतात. जी पहिली मराठीतली पहिली डिक्शनरी होती. हे सगळं दिग्पालमुळे, त्याच्यासोबत काम केल्यामुळे कळतं गेलं,असं चिन्मय म्हणाला.

अडचणी नाही तर आव्हानं म्हणेल...
इतका भव्यदिव्य ऐतिहासिक सिनेमा साकारताना अनेक अडचणी येत असतील, याबद्दल काय सांगशील, यावर मी याला अडचणी नाही तर आव्हानं म्हणेल, असं चिन्मय म्हणाला. दिग्पालला स्वत:ला चॅलेंज करण्याची सवय आहे. ‘फत्तेशिकस्त’चं आम्ही राजगडावर जाऊन शूटींग केलं. पावनखिंडचं जवळजवळ 80टक्के चित्रीकरण गुडघाभर चिखल आणि पाऊस यात झालंय, आम्ही क्रोमा आणि सेटचा फार कमी वापर करतो. आम्ही खऱ्या सेटवर जाऊन शूट करतो. पावनखिंड करताना खऱ्या पावनखिंडीत जाऊन शूट करणं खूपचं कठीण होतं. त्यात इजा होण्याची शक्यता होती. पण राजगडाच्या पायथ्याशी त्या खोऱ्यात दिग्पालने तशीच एक खिंड शोधून काढली. चित्रपटात जी खिंड तुम्हाला दिसतेय, ती शोधलेली आणि क्रिएट केलेली आहे. पण त्यातलं आकाश हे खरं आकाश आहे. अशाठिकाणी जाऊन शूटींग करणं सोप्प नसतं. पण आता सवय झालीये, असं चिन्मय म्हणाला.

एकही असा डोळा नसेल जो कोरडा आहे...
पावनखिंडमधील अनेक दृश्य साकारणं आव्हानं होतं. पण त्यातल्या त्यात महाराज बाजीप्रभूंचा निरोप घेतात, तो सीन साकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. आता कदाचित बाजींना मी परत नाही बघणार, हे महाराजांना कळतं, तेव्हाचा तो सीन आठवूनही मी भावुक होतो. मला खात्री आहे की, हा चित्रपट संपल्यानंतर एकही असा डोळा नसेल जो कोरडा आहे,असं चिन्मय म्हणाला.

 जिरेटोप काढून ठेवल्यावर...
सेटवर मी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारत असताना महाराजांची प्रतिष्ठा राखण्याचा मी प्रयत्न करतो. त्या पोशाखात शिरलो की मी त्यावर कोणाबरोबरही फोटोही काढत नाही. त्या पोशाखात मी अगदी दिग्पालसोबतही फोटो काढलेला नाही. कारण शेवटी तो मी नाही तर ते महाराजांचं एक रूप आहे. मी पूर्णपणे महाराजांचं रूप धारण करून सेटवर आलो की, सेटवरची भंकस आपोआप थांबते. अगदी सेटवरच्या सगळ्यांचीच. जिरेटोप काढून ठेवल्यावर मी पुन्हा चिन्मय असतो, असं चिन्मय म्हणाला.  

Web Title: Pawankhind Marathi Movie Exclusive Interview with Chinmay Mandlekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.