Pawankhind : एका झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ (Pawankhind) हा सिनेमा गेल्या 18 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. अगदी ‘पावनखिंड’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं तेव्हापासूनच प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. आता या सिनेमाने एका आगळ्या वेगळ्या विक्रमावरही नाव कोरलं आहे.
रचला विक्रम
महाराष्ट्रभरातल्या चित्रपटगृहांध्ये या सिनेमाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल 1500 हून अधिक शो मिळाले. एका दिवसात इतके शो मिळवणारा ‘पावनखिंड’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत.
राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याच पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास ‘पावनखिंड’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'पावनखिंड' सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. चिन्मय मांडलेकर यांनी शिवरायांची भूमिका जिवंत केली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊंची भूमिका साकारली आहे. अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
प्राजक्ता माळीची खास पोस्ट
‘पावनखिंड’ला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, या चित्रपटातील कलाकार खुश्श आहेत. प्राजक्ता माळीने एक खास पोस्ट शेअर करत, याबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे. प्राजक्ताने या चित्रपटात श्रीमत रायाजीराव बांदल यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आभार मानायला शब्द अपूरे पडत आहेत. मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले, अशी पोस्ट प्राजक्ताने शेअर केली आहे.