Join us

Perspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 4:31 PM

लोकमतने निर्मित केलेली 'परस्पेक्टिव्ह' ही शॉर्टफिल्म सोशल मीडियाद्वारे नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही शॉर्टफिल्म सध्या चांगलीच गाजत आहे.  

ठळक मुद्देहिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न ब्रिटिश काळापासून सुरू आहे

लोकमतची निर्मिती असलेली 'परस्पेक्टिव्ह' ही शॉर्टफिल्म सोशल मीडियाद्वारे नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही शॉर्टफिल्म सध्या चांगलीच गाजत आहे.  सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय?, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय?, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.   

एखादी घटना पाहून आपल्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं... पुढे काय होऊ शकतं, याचे तर्क आपण लढवू लागतो... मन खूप चंचल असल्याने क्षणार्धात आपण कुठल्या कुठे जाऊन पोहोचतो... कधी-कधी आपला अंदाज तंतोतंत खरा ठरतो, तर कधी पार चुकतो. आपण कोणत्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे बघतोय यावर चूक-बरोबरचं गणित ठरत असतं किंवा ती घटना आपल्याला एक वेगळाच दृष्टिकोन देऊन जात असते. 'परस्पेक्टिव्ह' या लघुपटातही असाच एक प्रसंग आहे, जो आदिनाथ कोठारेनं प्रत्यक्ष अनुभवला होता. 

हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न ब्रिटिश काळापासून सुरू आहे. पण, सामान्य नागरिक धर्माची बंधनं झुगारून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी झाल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. सर्वधर्मसमभाव, विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. त्यावरच 'परस्पेक्टिव्ह' हा लघुपट प्रकाशझोत टाकतो. आज जात-धर्म माणुसकीपेक्षा वरचढ ठरण्याची भीती निर्माण झाली असताना हा लघुपट प्रत्येकानंच पाहण्याची गरज आहे.

 

'मी मुंबईत गाडी चालवत असताना गणपतीची विसर्जन मिरवणूक वाजत-गाजत निघाली होती. त्याचवेळी समोरच्या रस्त्यावरून एका मुस्लीम व्यक्तीची अत्यंयात्रा जात होती. ते दृश्यं पाहून मनात शंकाकुशंकांचं काहुर माजलं.  आता काय होणार?, असा मोठ्ठा प्रश्न पडला. त्यानंतर प्रत्यक्षात काय घडले हे तुम्हाला 'परस्पेक्टिव्ह' या लघुपटात पाहायला मिळेल', असं लघुपटाचा सहनिर्माता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारेनं सांगितलं. या लघुपटाला जगभरातील दहा फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरवण्यात आलं आहे.

टॅग्स :आदिनाथ कोठारे