गणेशोत्सव म्हटलं की खूप सारी धम्माल असते, त्यामुळं साहजिकच खूप सा-या आठवणी आणि किस्से असतात. मात्र यंदाचा गणशोत्सव हा थोडा वेगळा असणार आहे. यावर्षी कोरोना संक्रमणामुळे सर्वच सण घरात राहून, योग्य काळजी घेत साजरे होत आहे. त्यानुसार गणपतीचेही आगमन यंदा सर्वत्रच धुमधडाक्यात होत नसलं तरीही बाप्पाच्या आगमनाची तयारी घरोघर सुरू झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. मराठी कलाकारांनीही घरी बाप्पासाठी खास तयारी केली आहे. अनेक कलाकार दरवर्षी स्वतःच्या हातानी बाप्पाची मूर्ती घडवतात.
यंदाही दिग्दर्शक रवी जाधव स्वतःच्या हातानं बाप्पाची मूर्ती घडवतोय. गणरायाची अनेक रुपं आहेत. त्याचं प्रत्येक रुप आगळं वेगळं. हे प्रत्येक रुप डोळ्यात साठवून ठेवावं असंच असतं. अशीच भावना सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो पाहून तुमच्याही मनात निर्माण होईल. सध्या सर्वत्रच मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरु आहे.
डोळ्यात साठवून ठेवावं असं हे बाप्पाचं रुप... आकर्षक मूर्ती आणि खुद्द दिग्दर्शक रवी जाधवनेही बाप्पाची मुर्ती घडवली म्हटल्यावर त्याची बातच न्यारी. नेहमीप्रमाणे यंदाही रवी जाधवच्या घरी साजरा होणारा बाप्पाचा उत्सव स्पेशल असणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाची हानी होऊ नये याचीच आपण सा-यांनी काळजी घेतली पाहिजे हे आपण वारंवार ऐकतो मात्र याची सुरूवात रवी जाधवने स्वतःपासूनच केली आहे.