अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आणि दीपा परब (Deepa Parab) ही मराठीतली ऑलटाईम हिट जोडी आहे. आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या अंकुश चौधरीचा ३१ जानेवरी रोजी वाढदिवस झाला. विशेष म्हणजे अंकुशचा वाढदिवस असण्याबरोबरच याच दिवशी अंकुश आणि दीपा यांच्या लग्नाचाही वाढदिवस असतो. या लोकप्रिय जोडीनं गरजूंना अन्नदान करत यंदाचा वाढदिवस साजरा केला आहे.
सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अभिनेता अंकुश व दीपा चौधरी यांच्या अनोख्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खास झलक पाहायला मिळत आहे. अंकुश व दीपा यांनी स्वत:च्या हाताने गरिबांना अन्नदान केलं. तसेच दोघांनी एक छोटा केकही कापल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. वाढदिवशी मोठमोठ्या पार्टी न करत गरिबांना अन्नदान केल्यानं दीपा आणि अंकुशचंं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
तन्मय पाटेकर व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'आज अंकुश चौधरी आणि दीपा परब ह्यांनी अन्नदान करून आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस आमच्यासोबत साजरा केला. हा योगायोग स्वामींनी जुळवून आणला असं बोलायला हरकत नाही. आदरणीय मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित अभिनेता व अभिनेत्रीचे मनापासून आभार'. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनीही अंकुशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या. तसेच अनेकांनी 'श्री स्वामी समर्थ' अशा कमेंट केल्या आहेत.
दीपा आणि अंकुशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अंकुशने अपार मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे. 'महाराष्ट्राची लोकधारा' मधून करिअरची सुरुवात केलेल्या अंकुशने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतेच तो 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर दिपाने 'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केलं. इतकंच नाही तर अलिकडेच बाईपण भारी देवा या सिनेमातही ती झळकली.